Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:31 IST2025-07-02T09:30:31+5:302025-07-02T09:31:30+5:30
Mumbai Local Train News: अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला प्रवाशांकडे सोडून जाणाऱ्या महिलेविरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एक महिला अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला प्रवाशांकडे सोडून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बाळाला निरीक्षणासाठी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. तसेच बाळाला सोडून देणाऱ्या महिलेबद्दल कोणतीही असलेल्या लोकांना पुढे येण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील रहिवासी दिव्या नायडू (वय, १९) सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिची मैत्रिण भूमिका मानेसोबत सीएसएमटीहून जुईनगरला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ट्रेन सानपाडा स्टेशनवरून जात असताना दोन्ही मैत्रिणी जुईनगरला उतरण्यासाठी दरवाजाकडे गेल्या. त्याच डब्यात ३० ते ३५ वयोगटातील एक अज्ञात महिला आपल्या बाळाला घेऊन बसली होती.
या महिलेच्या हातात तीन पिशव्या होत्या. सामानामुळे बाळाला घेऊन खाली उतरू शकत नसल्याने या महिलेने दिव्या आणि भूमिका यांच्याकडे मदत मागितली. तसेच त्यांना बाळाला घेऊन सीवूड्सपर्यंत सोबत येण्याची विनंती केली. महिला एकटी असल्याने दोन्ही तरुणींनी तिला मदत करण्यास सहमती दर्शवली आणि बाळाला घेऊन सीवूड्स रेल्वेस्थानकावर उतरल्या. परंतु, बाळाची आई खाली उतरलीच नाही. कदाचित सामानामुळे या महिलेला ट्रेनमधून खाली उतरता आले नसेल, असे समजून दोघेही बराच वेळ सीवूड्स स्थानकावर महिलेची वाट पाहत थांबल्या. परंतु, जेव्हा ती महिला परत आली नाही, तेव्हा त्यांनी बाळाला जुईनगर येथील भूमिका हिच्या घरी नेले. पुढे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी वाशी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेची तक्रार केली.
याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानुसार, संबंधित महिला खांदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याचे समजले असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे, अशी माहिती वाशी रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिली.