विकीच्या फरार साथीदाराला गव्हाणमधून अटक; हत्या, अपहरणाचे गुन्हे

By सूर्यकांत वाघमारे | Published: February 25, 2024 07:12 PM2024-02-25T19:12:45+5:302024-02-25T19:13:08+5:30

विकीच्या अटकेनंतर पोलिस होते मागावर

Vicky's fugitive accomplice arrested from Gavan; Crimes of murder, kidnapping | विकीच्या फरार साथीदाराला गव्हाणमधून अटक; हत्या, अपहरणाचे गुन्हे

विकीच्या फरार साथीदाराला गव्हाणमधून अटक; हत्या, अपहरणाचे गुन्हे

नवी मुंबई : गुंड विकी देशमुखच्या अटकेनंतर भूमिगत झालेल्या त्याच्या साथीदारांपैकी राकेश कोळीला शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. गव्हाण येथे तो येणार असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेने त्याठिकाणी सापळा रचला होता. विकी देशमुख याने २०१९ मध्ये केलेल्या हत्येत कोळीचा सहभाग होता. 

पोलिसांच्या अटकेत असलेला गुंड विकी देशमुख याचा साथीदार राकेश कोळी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा कक्ष एकने गव्हाण परिसरात सापळा रचून त्याला पकडले आहे. विकीचा साथीदार सचिन गर्जे हा फुटणार असल्याच्या संशयातून त्याचे अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा टोळीवर आहे. या हत्याकांडमध्ये विकी सोबत कोळीचाही समावेश होता. अपहरण, हत्या, खंडणी अशा गुन्ह्यातून विकी देशमुख टोळीच्या वाढत्या दहशतीमुळे नवी मुंबई पोलिसांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर तीन वर्षांनी २०२२ मध्ये विकीला गोव्यात अटक करून त्याचे गुन्ह्यातले साथीदार, कुटुंबीय अशा १६ जणांना अटक केली आहे. मात्र त्याच्या इतरही मोकाट साथीदारांपासून तक्रारदार, साक्षीदार यांच्या सुरक्षेला धोका होता. यामुळे पोलिस त्यांच्या मागावर असतानाच कोळी पोलिसांच्या हाती लागला.

राकेश हा त्याच्या घरी येणार असल्याच्या माहितीवरून अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक प्रताप देसाई आदींच्या पथकाने सापळा रचला होता. यामध्ये त्याला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ मार्च पर्यंतची कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्यामार्फत केला जात आहे. 

विकी देशमुख व त्याच्या साथीदारांवर १४ गंभीर गुन्हे दाखल असून त्यापैकी ९ गुन्ह्यात त्याला व साथीदारांना मोक्का लागलेला आहे. यामुळे मागील दोन वर्षात पोलिसांनी पनवेलसह परिसरातून त्याची दहशत पूर्णपणे मोडीत काढली आहे.  

Web Title: Vicky's fugitive accomplice arrested from Gavan; Crimes of murder, kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.