नवी मुंबई विमानतळाच्या तिसऱ्या रनवेचा अभ्यास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:20 IST2026-04-16T09:15:39+5:302026-04-16T09:20:20+5:30
Navi Mumbai News: मुंबई महानगर प्रदेशाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याच्या शक्यतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी सिडकोने ‘राइट्स लिमिटेड’ आणि ‘क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपी’ या संयुक्त सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या तिसऱ्या रनवेचा अभ्यास सुरू
नवी मुंबई - मुंबई महानगर प्रदेशाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याच्या शक्यतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी सिडकोने ‘राइट्स लिमिटेड’ आणि ‘क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपी’ या संयुक्त सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. हा अभ्यास सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे.
१५ एप्रिल २०२६ रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभ्यासाची रूपरेषा आणि अपेक्षित निष्कर्षांवर चर्चा झाली. भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक नियोजनालाही यावेळी अंतिम स्वरूप देण्याची दिशा निश्चित करण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासोबत दुहेरी विमानतळ प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे. वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण लक्षात घेता ही प्रणाली आगामी काळात निर्णायक ठरणार आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या विमानतळाची पूर्ण क्षमता विकसित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन माल हाताळण्याची क्षमता असेल.
सिडकोची चाचपणी
मुंबई महानगर प्रदेशातील हवाई प्रवासी संख्या २०४० पर्यंत १५० दशलक्ष, तर २०४७-५० दरम्यान २४० दशलक्षपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वाढवण येथे प्रस्तावित तिसऱ्या विमानतळाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाच्या विस्तारातूनच ही वाढ हाताळण्याचा पर्यायही सिडको तपासत आहे.
कोणत्या गोष्टींचा अभ्यास होणार?
सल्लागार संस्था तांत्रिक, पर्यावरणीय, आर्थिक आणि कार्यकारी पैलूंवर सखोल अभ्यास करणार असून, जमीन उपलब्धता, खर्च, हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि अंमलबजावणीची व्यवहार्यता यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या अहवालावरून विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जागतिक दर्जाचे विमानतळ म्हणून विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भविष्यातील वाढत्या हवाई वाहतुकीचा विचार करून आतापासून नियोजन करणे आवश्यक आहे. तिसरी धावपट्टी ही विमानतळाची क्षमता, कार्यक्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको