बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी

By योगेश पिंगळे | Published: April 28, 2024 05:00 PM2024-04-28T17:00:58+5:302024-04-28T17:01:43+5:30

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत आणि रहिवाशांनी नऊ वर्षांपूर्वी इशारा देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

Silent Human Chain to Save Belapur Hills | बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी

बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी

नवी मुंबई : बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणाकडे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाविरोधात स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमींनी रविवारी एक मोठी मूक मानवी साखळी तयार केली. ‘सेव्ह बेलापूर हिल्स’ आणि ‘स्टॉप मर्डर ऑफ ट्रीज’ अशा घोषणा देणारे बॅनर घेऊन रहिवाशांनी एमजीएम हॉस्पिटल जंक्शनजवळ मानवी साखळी केली.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत आणि रहिवाशांनी नऊ वर्षांपूर्वी इशारा देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. नॅटकनेक्टच्या तक्रारीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला या समस्येची चौकशी करण्यास सांगितले आहे. कुमार म्हणाले की, इमारतींमुळे टेकडी कमकुवत होऊ शकते आणि आगामी पावसाळ्यात भूस्खलन होऊ शकते, परंतु, सिडकोने अद्याप निर्णायकपणे कार्यवाही केलेली नाही. नॅटकनेक्टने आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करून टेकडी वाचवण्यासाठी कोणती पावले उचलली याची माहिती मागितली.

सिडकोकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमण वाढत असल्याची खंत स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. बेकायदेशीर बांधकामांना पाणी आणि वीज जोडणी मिळते हे धक्कादायक असल्याचे आणखी एक रहिवासी हिमांशू काटकर म्हणाले. टेकडीचे चौफेर अतिक्रमणांमुळे प्रचंड नुकसान होत आहे आणि आम्हाला दरडी कोसळण्याची भीती असल्याचे हिल व्ह्यू रो-हाऊस सोसायटीतील दशरथ भुजबळ यांनी सांगितले. उच्च अधिकारी सतत दुर्लक्ष करत असून, हे धक्कादायक असल्याचे सांगत इर्शाळवाडी भूस्खलनासारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा घेत नसल्याची खंत खारघर टेकडी आणि वेटलँड समूहाच्या ज्योती नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

Web Title: Silent Human Chain to Save Belapur Hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.