राहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्याकांडाचा नवी मुंबईत निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 18:14 IST2024-01-29T18:13:41+5:302024-01-29T18:14:43+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणारे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दाम्पत्य २५ जानेवारीपासून बेपत्ता होते.

राहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्याकांडाचा नवी मुंबईत निषेध
नवी मुंबई : पाच लाखांच्या खंडणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांच्या निर्घृण हत्येचा सोमवारी नवी मुंबईत वकील संघटनेने वाशीतील शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून निषेध नोंदविला. यावेळी उपस्थित वकिलांनी या हत्याकांडाचा निषेध करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी केली. याप्रसंगी नवी मुंबईतील वकिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणारे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दाम्पत्य २५ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला असता त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह दगडाने बांधून विहिरीत टाकल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी जलद तपासकार्य फिरवून आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. आरोपींचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे असल्याचे नवी मुंबई वकील संघटनेचे ज्ञानेश्वर कवळे यांनी सांगितले.