रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:51 IST2025-10-18T09:49:26+5:302025-10-18T09:51:02+5:30
आगीमध्ये जेल फार्मास्युटिकल्स कंपनीला लागूनच असलेल्या इतरही दोन कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. परंतु आग इतरत्र पसरणार नाही याची खबरदारी अग्निशमन दलाने घेतली.

रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमधील जेल फार्मास्युटिकल्स या सुगंधी तेल, अगरबत्ती, शोभेच्या मेणबत्ती आदी सुगंधी उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्याला गुरुवारी रात्री १ वाजता भीषण आग लागली. यामध्ये कारखाना जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण स्पष्ट नाही.
कारखान्याच्या आत सुरुवातीला लागलेली छोटी आग विझविण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, ती आटोक्यात न आल्याने रात्रपाळीत काम करणाऱ्या सुमारे ७० हून अधिक कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. रबाळे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु उत्पादनांसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांनी पेट घेतल्याने तासाभरातच सुमारे ३ हजार मीटर क्षेत्रफळाच्या संपूर्ण कारखान्यात आग पसरली. त्यात हजारो लिटरचा मेन व रसायनांचा साठा असलेल्या पाचही टँक पेटू लागले.
दोन कंपन्यांना होता धोका :
आगीमध्ये जेल फार्मास्युटिकल्स कंपनीला लागूनच असलेल्या इतरही दोन कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. परंतु आग इतरत्र पसरणार नाही याची खबरदारी अग्निशमन दलाने घेतली. त्यातूनही बाजूलाच असलेल्या डोल इंजिनिअर्स कंपनीच्या काही भागात आग पसरल्याने त्यांचेही नुकसान झाले. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे सुमारे वीस तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी एमआयडीसीसोबतच नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे, ऐरोली व वाशी येथील अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. दुर्घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले.