बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 05:31 IST2025-10-19T05:31:04+5:302025-10-19T05:31:25+5:30
बोगस नावांमुळे सकाळच्या सत्रात मोठे मतदान होऊन प्रामाणिक उमेदवारांना त्याचा फटका बसतो, असे आ. म्हात्रे म्हणाल्या.

बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: बोगस आणि दुबार मतदार नावांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच भाजपाच्या बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी बोगस आणि दुबार मतदारांची नावे टाकण्यासाठी अधिकारीच पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप शनिवारी केला. बेलापूर मतदारसंघातील झोपडीधारकांच्या सर्वेक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
बेलापूर मतदारसंघातून तीन निवडणुका लढले, प्रत्येक वेळी सर्वेक्षण करून २० ते २२ हजार मतदारांच्या नावांची यादी अधिकाऱ्यांकडे दिली. परंतु, त्यावर कारवाईच होत नाही. अनेकदा जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी आणि बीएलओंकडे तक्रारी केल्या. तरीही ही नावे पुन्हा पुन्हा दिसतात, असे म्हात्रे म्हणाल्या. काही ठिकाणी अधिकारी या नावांच्या नोंदणीत सामील असतात आणि अनेकदा या व्यवहारात पैशांची देवाणघेवाणही होत असल्याचे दिसते. बोगस मतदानामुळे प्रामाणिक उमेदवारांना मोठा फटका बसत आहे, असे त्या म्हणाल्या.
....तर घर मिळण्यातील अडचणी दूर होतील
बेलापूर मतदारसंघातील झोपडीधारकांचे सर्वेक्षण सुरू केले असून, याचा ३५ ते ४० हजार झोपडीधारकांना लाभ होईल. त्यांनी पुरावे सोबत ठेवावेत. जेणे करून पुनर्विकासात घर मिळण्यातील अडचणी दूर होतील, असे आ. मंदा म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले. बोगस नावांमुळे सकाळच्या सत्रात मोठे मतदान होऊन प्रामाणिक उमेदवारांना त्याचा फटका बसतो, असे आ. म्हात्रे म्हणाल्या.