Manoj Jarange Agitation Navi Mumbai Traffic News: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली. जरागेंच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून आंदोलक मुंबईकडे निघाले असून, नवी मुंबईतून मराठा मोर्चा जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही बदल केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. त्यांना अटी शर्थींसह परवानगी दिली गेली असून, वाहतुकीच्या मार्गातही बदल केले गेले आहेत. नवी मुंबई पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर पर्यायी रस्तेही खुले करण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील वाहतुकीमध्ये कोणते बदल असणार?
नवी मुंबई वाहतूक पोली उपायुक्त तिरुपती काकडे यांनी काढलेल्या आदेशानुसार वाहतुकीत बदल केले गेले आहेत. त्यानुसार खालील रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद असणार आहेत.
वाशी व्हाया पळस्पे-गवाणफाटा-पाम बीच हा रस्ता आंदोलकांच्या गाड्यांसाठीच राखीव असणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे कोणफाटा ते बोरले टोलनाका, पळस्पे फाटा यादरम्यान बंद असणार आहे.
जेएनपीटी महामार्ग (पळस्पे-अटल सेतू लिंक) अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे.
पळस्पे फाटा ते डी पॉईंट जेएनपीटी मार्गावरून आंदोलकांची वाहने जाणार असल्याने इतर वाहनांसाठी बंद असणार आहे.
गवाण फाटा ते किल्ला जंक्शन मार्गही फक्त आंदोलकांच्या वाहनांसाठीच खुला असणारा आहे.
वाशी प्लाझा आणि वाशी रेल्वे स्थानक परिसर इतर वाहनांसाठी बंद असणार आहे. सीबीडी ते पाम बीच मार्गही आंदोलकांच्या गाड्या जाईपर्यंत बंद असणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
हलकी वाहने आणि दुचाकींसाठी पनवेल-सायन महामार्ग व्हाया कळंबोली सर्कल, खालापूर-खोपोली मार्गे जाऊ शकतात.
जेएनपीटीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता सायगाव, दिघोडे , चिरनेर रोड असा असणार आहे.
वाशीकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना पनवेल-सायन मार्ग आणि सानपाडा सर्व्हिस रोड खुला असणार आहे.
बंद असणाऱ्या मार्गावरून आणीबाणीच्या सेवा विभागातील वाहनांना प्रवेश असणार आहे. यात रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस आणि जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.