Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:13 IST2025-12-31T12:12:40+5:302025-12-31T12:13:56+5:30
Navi Mumbai Crime: शाळेत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाला इन्स्टाग्रामवरुन मेसेज आले. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून भेटायला बोलावलं आणि त्यानंतर जे घडलं ते सगळ्यांनाच हादरवून टाकणारं होतं.

Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
Navi Mumbai Crime news: दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या १५ वर्षाच्या मुलाला इन्स्टाग्रामवर मेसेज आले. त्यानंतर बोलणं सुरू झालं. हळूहळू बोलणं वाढत गेलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. तिने त्याला भेटायला बोलावलं. तो कॅब करून भेटायला गेला. कॅबमधून उतरल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले आणि २० लाखांची खंडणी मागण्यात आली. नवी मुंबईतील ऐरोलीत मुलाचे कल्याणमध्ये अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती ज्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं, तो ऐरोलीतील दिवा गावातील आहे. दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाला एका मुलीच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरून मेसेज आले. मूळात मुलीच्या नावाने असलेले हे अकाऊंट फेक होतं. मुलांनीच ते तयार केलं होतं आणि मुलगी म्हणून ते १५ वर्षीय मुलाशी बोलत होते.
इन्स्टाग्रामवरून मेसेज अन् प्रेमाचं जाळं टाकलं
आरोपी मुलाला मुलगी म्हणून मेसेज पाठवत होते. त्यांनी त्यांच्याशी बोलणं वाढवलं. मुलगा त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला. त्यांनी त्याला भेटायला बोलवलं. मुलाला वाटलं मुलीने भेटायला बोलावलं.
कल्याण पूर्वमधील नांदिवलीमध्ये ये असे सांगून त्यांनी मुलाला बोलावून घेतलं. प्रेयसीला भेटण्याच्या ओढीने मुलगा ओला कॅब करून गेला. पण, तिथे पोहोचल्यानंतर आधीच दबा धरून बसलेल्या चौघांनी त्याला पकडले आणि एका खोलीत डांबले.
मुलांच्या कुटुंबीयांना मागितले २० लाख
मुलाचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलाच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअपवरून एक मेसेज केला. मुलाचे अपहरण केले आहे २० लाख रुपये द्या.
मुलाचे पालक मेसेज ऐकून घाबरले. त्यांनी तातडीने रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि ज्या कॅबने मुलगा गेला होता, ती कॅब शोधली. त्यानंतर चालकाकडून माहिती घेतली.
त्यानंतर पोलिसांचे पथक नांदिवलीमध्ये पोहोचले आणि सावधपणे कारवाई करत मुलाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रदीकुमार जयस्वाल (वय २४), विशाल पासी (वय १९), चंदन मौर्या (वय १९) आणि सत्यम यादव (वय १९) या चार जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.