Navi Mumbai Accident: सायन-पनवेल महामार्गावर हिट-अँड-रन! SUVच्या धडकेनंतर बसखाली चिरडून डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:22 IST2025-10-09T14:41:53+5:302025-10-09T15:22:50+5:30
नवी मुंबई एका भरधाव कारचालकाने दिलेल्या धडकेत एका डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Navi Mumbai Accident: सायन-पनवेल महामार्गावर हिट-अँड-रन! SUVच्या धडकेनंतर बसखाली चिरडून डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
Delivery Boy Death: सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द टोल नाक्याजवळ सोमवारी रात्री एक अत्यंत भीषण हिट-अँड-रनची घटना घडली. या अपघातात मोहम्मद फाजिल खान (वय ४५) नावाच्या एका डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका भरधाव एसयूव्ही कारने फाजिलच्या स्कूटरला मागून धडक दिली. धडकेमुळे तो रस्त्यावर फेकला गेला आणि त्यानंतर मागून आलेल्या खासगी बसखाली तो चिरडला गेल्याची माहिती पोलिसांनी दिला.
मोहम्मद फाजिल खान हा भायखळा येथील महात्मा फुले नगरचे रहिवासी होता आणि तुर्भे येथील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१० च्या सुमारास तो आपल्या स्कूटरवरून वाशीच्या दिशेने जात होता. मानखुर्द टोलनाक्याजवळ त्याच्या पाठीमागून आलेल्या एका वेगवान एसयूव्ही कारने फाजिलच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, फाजिल रस्त्यावर फेकला गेला.
फाजिल रस्त्यावर पडताच, त्याच वेळी मागून येणाऱ्या 'नाईक ट्रॅव्हल्स'च्या एका खासगी बसच्या मागील चाकाखाली तो चिरडला गेला. अपघातानंतर एसयूव्ही चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, तर बसचा चालक चैन सिंग चौहान यानेही निष्काळजीपणा दाखवला.
अपघातानंतर आकाश धागे नावाच्या व्यक्तीसह उपस्थित असलेल्या काही लोकांनी फाजिलला बसखालून बाहेर काढले. त्यांनी तातडीने मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि गंभीर जखमी झालेल्या फाजिलला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान ७ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर फाजिलचा भाऊ परवेझ खान यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात एसयूव्ही चालक आणि बसचा चालक चैन सिंग चौहान यांच्याविरुद्ध बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हिट-अँड-रन प्रकरणात पळून गेलेल्या अज्ञात एसयूव्ही चालकाला शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षा आणि वेगवान तसेच निष्काळजी वाहन चालवण्याच्या घटनांवरुन पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.