मालमत्तेसाठी ९० वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या; पोलिसांना नातेवाईकावर संशय, लवकरच अटकेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:29 IST2025-11-23T16:29:00+5:302025-11-23T16:29:00+5:30
नवी मुंबईत मालमत्तेच्या वादातून एका वृद्धेची हत्या करण्यात आली.

मालमत्तेसाठी ९० वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या; पोलिसांना नातेवाईकावर संशय, लवकरच अटकेची शक्यता
Navi Mumbai Crime:नवी मुंबईजवळील उरण तालुक्यात ९ नोव्हेंबर रोजी ९० वर्षीय विधवा हिराबाई जनार्दन जोशी यांच्या घरात झालेल्या मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सुरुवातीला अपघात मृत्यूची नोंद केलेल्या उरण पोलिसांनी आता हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा क्रूर मारेकरी पीडितेचा नातेवाईक असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोस्टमॉर्टम अहवालातून उघड झाले सत्य
९ नोव्हेंबर रोजी हिराबाई जोशी यांचा त्यांच्या घरात मृत्यू झाला होता. पोलिसांनी प्रथम अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. अहवालानुसार, शरीरावर कठीण वस्तूने केलेल्या हल्ल्यामुळे अनेक जखमा झाल्या होत्या आणि याच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले. यामुळे पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल केला.
मालमत्तेचा वाद ठरला हत्येचे कारण
उरणचे वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागील मूळ कारण मालमत्तेचा वाद असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी हत्येच्या दिवशीच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशनचा तपास सुरू केला आणि त्यात एका नातेवाईकावर संशय आला. तपासात मालमत्तेचा वाद हे हत्येचे कारण असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपीला चौकशीसाठी बोलावले असता त्याने आपला या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे सांगितले आणि त्याला सोडून देण्यात आले.
पोलिसांनी संशयित आरोपीचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपशील आणि हत्येच्या दिवशीचे मोबाईल टॉवर लोकेशन तातडीने मागवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा या माहितीची खातरजमा झाल्यानंतर या संशयित नातेवाईक आरोपीला रविवारीच अटक होण्याची शक्यता आहे.