Navi Mumbai Fire: ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नवी मुंबईतील कामोठे परिसर एका भीषण दुर्घटनेने हादरला आहे. कामोठे येथील एका सोसायटीत लागलेल्या आगीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीमधील सर्वजण बाहेर पडले मात्र आगीमुळे दोघांना बाहेर पडता आलं नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं आणि रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलं.
सेक्टर ३६ मधील अंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत घरात झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत आई आणि मुलीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुम क्रमांक ३०१ मध्ये दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली आणि तिचा भडका उडाला. घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील आई आणि मुलीला आगीच्या प्रचंड झळांमुळे बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्या आतच अडकून पडल्या.
घरात आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमधील नागरिकांनी तातडीने बाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत इमारतीवर चढून पाण्याचा मारा सुरू केला. अखेरीस आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, त्यानंतर घरात तपासणी केली असता, आत अडकलेल्या आई आणि मुलीचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दोघी नेमक्या कशा अडकल्या, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
घटनेतील मृतांच्या नावाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, दिवाळी सुरू असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे कामोठे परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा अधिक तपास सुरु आहे.
दरम्यान, सोमवारी मुंबईतील कफ परेड येथे लागलेल्या आगीत एका मुलाचा मृत्यू झाला होता.