वेशीवरील १४ गावांच्या मुद्द्यावर नाईक, शिंदेंच्या वादात आ. मंदा म्हात्रे यांची उडी; गणेश नाईकांच्या भूमिकेला दिला छेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 09:47 IST2025-10-04T09:40:01+5:302025-10-04T09:47:38+5:30
ठाणे आणि कल्याणच्या वेशीवरील १४ गावांच्या नवी मुंबई महापालिकेत समावेशावरून शिंदेसेना आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वाद रंगला आहे.

वेशीवरील १४ गावांच्या मुद्द्यावर नाईक, शिंदेंच्या वादात आ. मंदा म्हात्रे यांची उडी; गणेश नाईकांच्या भूमिकेला दिला छेद
नवी मुंबई : ठाणे आणि कल्याणच्या वेशीवरील १४ गावांच्या नवी मुंबई महापालिकेत समावेशावरून शिंदेसेना आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वाद रंगला आहे. आता या वादात गणेश नाईक यांच्या पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी उडी घेऊन नाईकांच्या भूमिकेला छेद देऊन अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे.
१४ गावांचा भुर्दंड कोणत्याही स्थितीमध्ये सहन केला जाणार नाही. निवडणुकीनंतर ही गावे वगळणारच. त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करायची तयारी आहे. वाटल्यास ती गावे ठाण्याला जोडा, असे मत नाईक यांनी वाशीतील मेळाव्यात व्यक्त केले होते. आम्हाला न विचारता ही गावे लादली आहेत. या गावांमुळे नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ६ हजार कोटी रुपयांचा ताण पडणार आहे. कुर्लामधील भंगारवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणांचाही गंभीर प्रश्न असल्याने ती वगळण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडेही केली आहे. निवडणुकीनंतर ती वगळण्यात येणार असल्याचेही नाईक म्हणाले होते.
दहा दिवसांपूर्वी या गावांमध्ये रस्ते, पाणी, शाळांची कामे तत्काळ हाती घ्या, असे आदेश नगरविकास मंत्री म्हणून शिंदेनी आयुक्त कैलास शिंदेंना दिले होते. तेंव्हा आयुक्तांनी १४ गावांसाठी १९ कोटींची तरतूद केल्याचे सांगितले होते. त्यानंतर नाईकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
मंदा म्हात्रे काय म्हणाल्या?
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील या वादाच्या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी ही १४ गावे आमचीच आहेत. त्यांनीही नवी मुंबईसाठी त्याग केलेला आहे. यामुळे शासनाने ही गावे दत्तक घेऊन तिथे सुविधा दिल्याच पाहिजेत, असे सांगून नाईकांच्या भूमिकेला छेद दिला आहे.
यामुळे वादात आणखी भर
नालायक लोकांच्या हाती सत्ता देऊ नका; नाहीतर, शहराचे वाटोळे होईल. महापालिका निवडणुकीत युती होवो अथवा न होवो, नवी मुंबई महापालिकेत महापौर मात्र भाजपचाच बसेल, असे दोन दिवसांपूर्वी वाशीतील एका कार्यक्रमात गणेश नाईक म्हणाले होते. त्यामुळे नाईक व शिंदे गटातील वाद आणखी पेटला आहे.