अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 07:51 IST2025-09-30T07:50:46+5:302025-09-30T07:51:11+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांसह फळांची आवक रोडावली

अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यातील अतिवृष्टीचा परिणाम कृषी व्यापारावरही झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व फळांच्या आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. तुटवड्यामुळे हिरव्या मिरचीचे दर दुप्पट झाले असून ते ८० ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. तसेच मोसंबी व पपईची आवक कमी झाली असून सीताफळाची आवकही ठप्प झाली आहे. शिवाय खराब झालेला कृषीमाल फेकूनही द्यावा लागत आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. फळबागांसह भाजीपालाही वाहून गेला आहे. राज्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात होते. संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा परिणाम मुंबईतील पुरवठ्यावरही झाला आहे. गत आठवड्यात रोज सरासरी १५५ टन आवक होत होती. सोमवारी फक्त ६९ टन आवक झाली. होलसेल मार्केटमध्ये भाव २० ते ५० रुपये किलोवरून ४० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये मिरची ८० ते १५० रुपये किलो दराने विकली जात आहे. फ्लाॅवर, बीट, घेवडा, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरामध्येही वाढ झाली आहे.
पावसामुळे फळबागांचेही नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपईचे प्रचंड नुकसान झाले आहे. गत आठवड्यात रोज १२० ते १५० टन पपईची आवक होत होती. सोमवारी ती ३८ टनावर आली. जालनामधील बागांचे नुकसान झाल्यामुळे मोसंबीची आवकही ३०० ते ३२५ टनावरून ११० टनावर आली आहे. सीताफळाची आवक जवळपास ठप्प झाली आहे.
फळमार्केटमध्ये पपई, मोसंबी व सीताफळाच्या आवकवर परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे बागांचे नुकसान झाले असून पुढील काही दिवस आवकवर परिणाम राहील. हिमाचल व काश्मीरच्या सफरचंदची सर्वाधिक आवक होत आहे.
संजय पानसरे, संचालक, फळमार्केट