नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 10:01 IST2025-10-21T10:01:17+5:302025-10-21T10:01:55+5:30
Navi Mumbai Fire: आग लागलेल्या आणि वरच्या मजल्यांवरून जवळपास १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या १० हून अधिक लोकांना तातडीने फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
नवी मुंबई: ऐन दिवाळीच्या काळात मुंबई, नवी मुंबईसह अतर शहरांत आगीच्या घटना घडू लागल्या आहेत. वाशी येथील सेक्टर १४ मधील 'रहेजा रेसिडेन्सी' या निवासी संकुलात आज पहाटे भीषण आग लागून ६ वर्षांच्या चिमुकलीसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची नावे वेदिका सुंदर बालकृष्णन (६), कमला हिरालाल जैन (८४), सुंदर बालकृष्णन (४४), पूजा राजन (३९) अशी आहेत.
आग लागलेल्या आणि वरच्या मजल्यांवरून जवळपास १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या १० हून अधिक लोकांना तातडीने फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कामोठेमध्ये दोघांचा मृत्यू...
नवी मुंबईतील कामोठे परिसर एका भीषण दुर्घटनेने हादरला आहे. कामोठे येथील एका सोसायटीत लागलेल्या आगीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीमधील सर्वजण बाहेर पडले मात्र आगीमुळे दोघांना बाहेर पडता आलं नाही.