तोतया जामीनदारांच्या टोळीला अटक

By Admin | Updated: July 8, 2017 06:02 IST2017-07-08T06:02:38+5:302017-07-08T06:02:38+5:30

: बनावट कागदपत्रांआधारे गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळवून देणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Detainee arrested by gangs | तोतया जामीनदारांच्या टोळीला अटक

तोतया जामीनदारांच्या टोळीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बनावट कागदपत्रांआधारे गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळवून देणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट शिधावाटप पत्रिका, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
न्यायालयांत बनावट जामीनदार उभे करून गुन्हेगारांना सोडवणारी टोळी शहरात सक्रिय होती. त्यापैकी काहींची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सतीश सरफरे यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक अमित शेलार, संजय पवार, हवालदार प्रदीप कदम, पोलीस नाईक दिलीप भस्करे, अनिल यादव, विजय पाटील यांचे पथक तयार करून बनावट सापळा रचला. ग्राहकाला बनावट जामीनदार व कागदपत्रे पुरवण्यासाठी तिघे जण दिघा गावात आले असता छापा टाकून कारवाई करण्यात आली. या वेळी मधुकर बाविस्कर (४७), श्रीराम बिंद (४४) व जिलेदार शर्मा (५१), अशी त्यांची नावे आहेत. तिघेही ठाणे, कल्याण व मुंबई परिसरातले राहणारे आहेत. झडतीमध्ये त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका, निवडणूक ओळखपत्र, बनावट टॅक्स पावत्या यांसह शासकीय कार्यालयांचे रबरी शिक्के, शिधावाटप पत्रिकेचे कोरे छापील कागद, असा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने मुंबई व ठाणे न्यायालयातून अनेक गुन्हेगारांना बनावट जामीनदारांमार्फत जामीन मिळवून दिलेला असल्याचे सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी सांगितले. तर या टोळीत इतरही काहींचा सहभाग असून, त्यांचाही शोध गुन्हे शाखा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Detainee arrested by gangs