नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:47 IST2025-10-08T17:46:27+5:302025-10-08T17:47:28+5:30
CM Devendra Fadnavis Navi Mumbai Airport Inaugural News: महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवण्याची क्षमता नवी मुंबई विमानतळात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
CM Devendra Fadnavis Navi Mumbai Airport Inaugural News: आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा आहे. गेल्या दहा वर्षांपासून ज्या गोष्टी आम्ही सांगतो आहोत, त्या गोष्टींचे लोकार्पण आज होत आहे. ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. नवी मुंबईचेविमानतळ हे नवभारताचे प्रतीक आहे. या विमानतळाची संकल्पना नव्वदीच्या दशकातली होती. महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवण्याची क्षमता हे विमानतळ ठेवते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आले, तेव्हा जी प्रगतीची कामे सुरू झाली, त्यात नवी मुंबई विमानतळ घ्यावे अशी विनंती आम्ही केली. पंतप्रधान मोदींनी आमची विनंती मान्य केली. त्यानंतर १० वर्षांमध्ये ८ एनओसी अशा होत्या, ज्या या विमानतळाची सुरुवात करण्यासाठी हव्या होत्या. पण त्या मिळत नव्हत्या. मोदींनी याची पहिली बैठक घेतली. त्यानंतर काही तासांत सात एनओसी मिळाल्या. त्यावर त्यांनी आठव्या एनओसीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. प्रशासनाने त्यावर काम केले आणि १५ दिवसांत आठवी एनओसी मिळवली. जे दहा वर्षे झाले नव्हते ते मोदींच्या एका बैठकीत झाले. अत्यंत सुंदर असे विमानतळ या ठिकाणी बांधले. कोट्यवधीची प्रवासी क्षमता असलेले हे विमानतळ आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात हे विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई...
महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. नागरी उड्डाण मंत्रालयाचे आभार मानतो. नागरी उड्डाण मंत्री के. नायडू मघाशी म्हणाले की, आपले पुढचे लक्ष्य हे वाढवण बंदर असेल. हे बंदर पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला भेट म्हणून दिले आहे. तिथेच देशातील पहिले ऑफशोर विमानतळ उभारणार आहोत. नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होणार आहे. वाढवणजवळ चौथी मुंबई होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, या विमानतळासाठी आपण डोंगर सपाट केला, नदीचे पात्र वळवले, अशा अनेक गोष्टी केल्या. मी खात्रीने सांगतो की हे एक विमानतळ महाराष्ट्राचा जीडीपी एका टक्क्याने वाढवू शकतो. या विमानतळाला आता वॉट टॅक्सीची सुविधा मिळणार आहे. हे विमानतळ इंजिनिअरिंग मार्वल आहे. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहतात. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.