नवी मुंबई - गणपतीच्या आगमनावेळी दोन मंडळांच्या पथकात लागलेल्या चुरशीचा शेवट हाणामारीने झाला. सीबीडी सेक्टर ८ येथे मंगळवारी रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली. यात रस्त्यालगतच्या काही दुकानांचेदेखील नुकसान झाल्याचे समजते.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येवर मंगळवारी अनेक मंडळांच्या मंडपात श्रीगणेशमूर्तींचे आगमन झाले. सीबीडी येथेही मंगळवारी रात्री दोन मंडळांच्या श्रीगणेशाची आगमन मिरवणूक सुरू होती. सेक्टर ८ येथे दोन्ही मंडळे समोरासमोर आली असता त्यांच्या बँड पथकात वाजविण्याची चुरस लागली. यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. यामध्ये रस्त्यालगत असलेल्या काही दुकानांची तोडफोडदेखील झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.