पंचशीलनगर येथील गाळ्यांवर कारवाई

By Admin | Updated: July 15, 2017 02:32 IST2017-07-15T02:32:27+5:302017-07-15T02:32:27+5:30

नवीन पनवेल येथील रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या पंचशीलनगर या झोपडपट्टीत असलेल्या व्यावसायिक गाळ्यांवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली

Action on the blocks in Panchsheel Nagar | पंचशीलनगर येथील गाळ्यांवर कारवाई

पंचशीलनगर येथील गाळ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : नवीन पनवेल येथील रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या पंचशीलनगर या झोपडपट्टीत असलेल्या व्यावसायिक गाळ्यांवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली. येथील व्यावसायिक गाळे पालिकेने बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी झोपडीच्या जागी व्यावसायिक गाळे बांधण्यात आले होते.
स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट पनवेलसाठी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम शुक्र वारी नवीन पनवेल येथे धडकली. आयुक्तांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली असली तरी लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित नव्हते. पंचशीलनगर येथे अनेक उच्चभ्रू लोकांनी व्यावसायिक गाळे विकत घेतले होते. त्याशिवाय येथील घरांना व्यापारी गाळ्यांचे स्वरूप देण्यात आले होते. प्रत्येक घर आणि व्यापारी गाळ्याची शहानिशा करून महापालिकेने ही कारवाई केली. या गाळ्यांमध्ये मच्छी विक्री, गॅरेज, मटणाची दुकाने, पक्षांची कार्यालये थाटण्यात आली होती. जवळपास ६० ते ७० गाळ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नवीन पनवेल येथील रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या पंचशील नगर या झोपडपट्टीत शेकडो व्यावसायिक गाळे बनविण्यात आले होते. काही नागरिकांनी कारवाईचे संकेत मिळताच आधीच गाळे खाली केले होते, तर काही गाळे चालकांनी व्यवसाय बंद करून गाळ्याला कापड व पत्रे मारले होते. काहींनी गाळ्यांवर विटांचे बांधकाम करून गाळे बंद केले होते. मात्र याला न जुमानता पालिकेने कारवाई केली व येथील गाळे जमीनदोस्त केले. कारवाईदरम्यान उपायुक्त जमीर भिंगरेकर, सहआयुक्त भगवान खाडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंखे हे उपस्थित होते.

Web Title: Action on the blocks in Panchsheel Nagar