मुरलीधर भवार, डोंबिवलीनिकषानुसार रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून बंद असलेले डोंबिवलीतील ८६ कारखाने पुन्हा सुरू करण्याचा दिलासा देण्यास राष्ट्रीय हरीत लवादाने बुधवारी नकार दिला. प्रदूषण रोखण्यासाठी सध्या केलेल्या उपाययोजनांबद्दल समाधानी नसल्याचे सांगत ठोस प्रस्ताव सादर करण्याचे आदेश लवादाने दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी दिवाळीनंतर ७ नोव्हेंबरला होणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी कारखानदारांनी केलेल्या उपाययोजनांचा ठोस प्रस्ताव त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करायचा आहे. त्याचे मूल्यमापन मंडळ करेल आणि त्या आधारेच निर्णय घेतला जाईल, असे लवादाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. डोंबिवलीतील कारखाने २ जुलैपासून बंद आहेत. डोंबिवलीच्या फेज टूमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात साचलेला गाळ काढणे, मोटारी दुरुस्त करणे, नादुरुस्त यंत्रणा दुरुस्त करणे आदी कामे केल्याचे सांडपाणी प्रक्रिया केंद्राने लवादासमोर मांडले. मात्र ही उपाययोजना तात्पुरती आहे. त्यातून प्रदूषण कमी होण्यास फारशी मदत होणार नाही. त्यामुळे कारखानदारांनी ठोस व कालबद्ध कार्यक्रम असलेला प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाला लवकरात लवकर सादर करावा. त्यात किती व कशा सुधारणा केल्या जाणार आहेत, निकषांची पूर्तता करण्यासाठी दीर्घकाळ कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याचा समावेश असावा. तो मंडळाला सादर केल्यावर मंडळ त्याचे मूल्यमापन करेल. त्यातून प्रदूषण कमी होणार असेल तरच तर त्याचा विचार लवाद करेल, असे स्पष्ट करण्यात आले. अंबरनाथच्या कारखान्यांना २५ टक्के दिलासा अंबरनाथ : सांडपाणी प्रक्रियेबाबत अंबरनाथच्या ४६ रासायनिक कारखान्यांना राष्ट्रीय हरीत लवादाने बुधवारी दिलासा देत २५ टक्के सांडपाण्यावर तीन महिने प्रक्रिया करण्यास मुभा दिली. सांडपाणी प्रकल्पात सुधारणा करण्यासाठी १५ कोटींची हमी १५ दिवसांत लवादाकडे जमा करण्याचे आदेश लवादाने दिले.ही रक्कम सांडपाणी केंद्राच्या सुधारणेवर खर्च केली जाणार आहे. प्रदूषणावर मंडळ लक्ष ठेवेल. ते तीन महिन्यात कमी न झाल्यास कारखानदारांनी स्वत:हूनच सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करावे, असे लवादाने स्पष्ट केले.