पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:56 IST2025-08-25T16:55:53+5:302025-08-25T16:56:42+5:30
पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला आज हिसार न्यायालयात हजर करण्यात आले.

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला आज हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. रिमांड कालावधी पूर्ण झाल्यानंतर ज्योतीला पहिल्यांदाच प्रत्यक्ष न्यायालयात आणण्यात आले. ९५ दिवसांनंतर ती तुरुंगाबाहेर आली असून, यापूर्वी ती २२ मे रोजी न्यायालयात हजर झाली होती. आजची सुनावणी सुमारे अडीच तास चालली. सुनावणीनंतर पोलिसांनी तिला पुन्हा तुरुंगात नेले. यापूर्वी ज्योतीची सात वेळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली होती.
१६ मे रोजी झाली होती अटक
१६ मे २०२५ रोजी ज्योतीला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ज्योती मल्होत्राचे वकील कुमार मुकेश यांनी सांगितले की, "आम्हाला अद्याप दोषारोपपत्राची प्रत मिळालेली नाही. पोलिसांनी अर्ज दिल्यानंतरच ती मिळेल, असे न्यायालयाने सांगितले आहे." पोलीस या प्रकरणात विलंब करत असल्याचा आरोप वकिलांनी केला. "आम्ही लवकरच दोषारोपपत्राच्या प्रतीची मागणी करणार आहोत. आरोपपत्र वाचल्यानंतरच जामीन अर्ज दाखल केला जाईल," असे ते म्हणाले. ज्योतीला पुढील सुनावणीसाठी ३ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
२५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी एसआयटीची स्थापना केली होती. ज्योतीच्या अटकेनंतर ९० व्या दिवशी, म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी एसआयटीने सुमारे २५०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तीन महिन्यांच्या तपासानंतर हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.
तुरुंगात वडिलांना बांधली राखी
९ ऑगस्ट रोजी यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा हिला भेटण्यासाठी तुरुंगात गेले होते. वडिलांना पाहताच ज्योतीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांनी धीर दिल्यावर ती त्यांना मिठी मारून रडू लागली. "तू लवकरच तुरुंगातून बाहेर येशील," असे वडिलांनी तिला सांगितले. ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी आपल्या मुलीवरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले असून, राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मुलीकडून राखी बांधून घेतली.