Mahakumbh 2025: दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच शिवरात्रीच्या दिवशी प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाची सांगता झाली. 45 दिवस चाललेल्या या पवित्र महाकुंभात स्नान करण्यासाठी देश-विदेशातून भाविक, साधू-संत, सेलेब्रिटी अन् राजकीय नेते आले होते. पण, या महाकुंभात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली नाही. यावरुन भाजप नेते सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनीही राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला.
जीतन राम मांझी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'राहुल गांधींना महाकुंभात स्नान करण्याबाबत विचारले जाणारे प्रश्न योग्य नाहीत. ज्या नेत्याने संपूर्ण काँग्रेस पक्ष बुडवला, तो आणखी किती बुडणार..!' असा खोचक टोला मांझी यांनी लगावला.
भाजपची राहुल गांधींवर टीका
महाकुंभात न जाण्यावरुन भाजपने गुरुवारी राहुल गांधींवर निशाणा साधत काँग्रेसवर स्वस्त राजकारण केल्याचा आरोप केला. देशातील बहुसंख्य जनतेला मूर्ख बनवण्यासाठी नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्य निवडणुकीपूर्वी मंदिरात जातात, असा आरोप भाजपने केला. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या महाकुंभाने हे सिद्ध केले आहे की, या देशात सनातनचा आदर करणारा पक्ष किंवा नेतृत्व असेल, तर ते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
ख्रिश्चन आई आणि पारशी वडिलांच्या मुलाचा हिंदू समाजाच्या या प्राचीन सणावर विश्वास नसणे स्वाभाविक आहे. राहुल गांधी यांनी 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर बांधलेल्या रामला मंदिराला (अयोध्या) अद्याप भेट दिलेली नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. परंतु जेव्हा तेच राहुल गांधी, त्यांची बहीण प्रियांका आणि आई सोनिया निवडणुकीपूर्वी मंदिरात जाण्याचे नाटक करतात, ते त्यांनी आता हे थांबवले पाहिजे. देशातील बहुसंख्य समाजाला मूर्ख बनवून राजकारण करण्याची काँग्रेसची ही दुष्ट प्रवृत्ती पूर्णपणे नाकारली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.