तिहारमधील जेल नंबर ७ यासीन मलिकचे नवे ठिकाण असेल, अशी आहे सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 21:18 IST2022-05-26T21:17:19+5:302022-05-26T21:18:26+5:30
Yasin Malik : तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिकला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल किंवा फर्लोचा हक्क मिळणार नाही.

तिहारमधील जेल नंबर ७ यासीन मलिकचे नवे ठिकाण असेल, अशी आहे सुरक्षा
नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुरुंगात त्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, यासिन मलिकला तिहारमध्ये कडेकोट बंदोबस्तात एका वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “सुरक्षेच्या कारणास्तव मलिक याला तुरुंगात कोणतेही काम सोपवले जाऊ शकत नाही. त्याला कडेकोट बंदोबस्तात कारागृह क्रमांक सातमधील एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच्या सुरक्षेवर नियमितपणे लक्ष ठेवले जाईल.”
तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिकला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल किंवा फर्लोचा हक्क मिळणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यापूर्वीच मलिकला एका वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते, जिथे तो तुरुंग क्रमांक सातमध्ये एकटाच राहत होता. दिल्लीच्या एका न्यायालयाने बुधवारी यासीन मलिकला दहशतवादासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याने केलेल्या गुन्ह्यांचा उद्देश "भारताच्या विचारसरणीवर हल्ला करणे" आणि जम्मू-काश्मीरला भारत संघापासून जबरदस्तीने वेगळे करणे हे होते आणि त्याला करायचेही होते. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी UAPA आणि भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या अटी सुनावली.
फाशीपासून वाचला, NIA कोर्टाने यासिन मलिकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
यासिन मलिकला जन्मठेप होताच पाकिस्तानचा तिळपापड, पंतप्रधानांनी भारताविरोधात उधळली मुक्ताफळे
तसेच 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे
काल एनआयए कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दोन प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासोबतच 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी हा निकाल दिला. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्वानपथकानेही न्यायालयात आणून तपासणी केली. यासिन मलिकला दोन खटल्यांमध्ये जन्मठेपेची आणि वेगवेगळ्या खटल्या आणि कलमांत प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.