Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:21 IST2025-09-04T10:20:04+5:302025-09-04T10:21:12+5:30

Yamuna River Flood Delhi: राजधानी दिल्लीची यमुना नदीने झोप उडवली आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणी पातळी २०७ मीटरवर पोहोचली आहे. गुरुवारी युमनेचे पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहचलं आहे. 

Yamuna Flood: Yamuna in full swing, water in Delhi's nose Houses under water, roads closed; Shocking scenes | Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये

Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये

Yamuna Flood Delhi: देशाच्या राजधानीमध्ये यमुनेच्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली असून, संततधार पावसामुळे यमुनेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यमुन नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, २०७.४१ वर पाणी पातळी पोहोचली आहे. ६३ वर्षांत यमुनेने चौथ्यांदा ही पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. युमनेला आलेल्या पुरामुळे दिल्लीच्या नाकातोंडातच पाणी गेलं आहे. गुरूवारी सकाळी नदीचे पाणी दिल्ली मंत्रालयापर्यंत पोहोचले होते. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिल्लीतील काही भागांची अवस्था बिकट झाली आहे. मुसळधार पाऊस यमुनेला आलेला महापूर यामुळे दिल्लीतील नदीकाठचीच नाही, तर इतर ठिकाणचीही घरे पाण्यात बुडाली आहेत. 

काही ठिकाणी बंगलेही पाण्यात

पुराचा फटका बसलेल्या लोकांसाठी निवारा शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. पण, मयूर विहार फेज-१ मधील शिबिरातही पाणी शिरले आहे. स्वामी नारायण मंदिर, फुटओवर ब्रिज, सिव्हिल लाईन या भागातील बंगलेही पाण्यात बुडाले आहेत. 

राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील अलीपूरजवळ असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यात एक रिक्षा अडकला आणि चालक जखमी झाला आहे.

यमुनेच्या पुराचे पाणी आता निवारा शिबिरांमध्ये घुसून सचिवालयापर्यंत पोहचले आहे. अनेक ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. कश्मिरी गेट परिसरातही पाणी शिरले आहे. 

यमुना खवळली, घरे बुडाली

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलावर यमुना नदीची पाणी पातळी २०७.४८ मीटर इतकी नोंदवली गेली आहे. रात्री २ वाजेपासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत पाणी पातळी स्थिर होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुरात घरे बुडालेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जात आहे. काही ठिकाणी निवार शिबिरातच पाणी शिरल्याने, मोठा गोंधळ उडाला होता. राजघाटाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. रिंग रोड परिसरातील कार्यालयांबाहेरही पाणी भरले आहे. त्यातच नाल्यांच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने तेही रस्त्यावर वाहू लागले आहे. 

दिल्लीच्या मंत्रालयाजवळ असलेल्या भुयारी मार्गात वेगाने पाणी भरत होते. भुयारी मार्गातील पाणी मंत्रालयाच्या दिशेने जात होते. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

सध्या यमुनेची पाणी पातळी स्थिर आहे, मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दिल्लीतील सखल भागात त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

Web Title: Yamuna Flood: Yamuna in full swing, water in Delhi's nose Houses under water, roads closed; Shocking scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.