शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 19:39 IST2025-04-18T19:21:42+5:302025-04-18T19:39:21+5:30
तेलंगणामध्ये प्रियकरासोबत राहण्यासाठी महिलेने तीन मुलांची हत्या केली

शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
Telangana Crime: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुस्कानने प्रियकरासोबत राहण्यासाठी तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्यानंतर आता तेलंगणामध्ये वर्गमित्र आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी एका महिलेने तिच्या तीन मुलांची हत्या केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. तेलंगणातील संगारेड्डीमध्ये महिलेने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी सगळ्या कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महिलेने स्वतःच्या हाताने तीन मुलांची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय रजिता आणि तिचा प्रियकर शिवकुमार यांना अटक केली आहे.
तेलंगणातील संगारेड्डी येथील अमीनपूरमध्ये रजिताने तिच्या तीन मुलांना विष देऊन मारल्याचा आरोप होता. रजिता तिच्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करणार होती. यासाठी तिने हा टोकाचा निर्णय घेतला. सुरुवातीला रजिताना जेवणातून विष देऊन मुलांना मारल्याचा आरोप होता. रजिताचा पतीला संपवण्याचाही डाव होता मात्र त्याने जेवण न केल्याने तो वाचला असेही म्हटलं जात होते. मात्र तपासादरम्यान, रजिताने स्वतःच्या मुलांचा गळा दाबल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवकुमार आणि रजिता काही दिवसांपूर्वी शाळेच्या गेट टु गेदरच्या कार्यक्रमात भेटले होते. रजिता आणि चेन्नईय्या यांचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. त्यावेळी रजिता ३० वर्षांची आणि चेन्नईय्या ५० वर्षांचे होते. वयाच्या अंतरामुळेच त्यांच्या नात्यात कटुता होती आणि वारंवार वाद होत होते. सहा महिन्यांपूर्वी रजिता तिच्या शाळेच्या गेट टु गेदरला गेली होती, जिथे ती शिवकुमारला अनेक वर्षांनी भेटली. त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्यांचे प्रेम पुन्हा जिवंत झाले. दोघांमधील नाते इतके घट्ट झाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नवीन जीवन सुरू करण्यासाठी, रजिताने तिच्या मुलांनाही मार्गावरून हटवले.
शिवाने सोबत राहण्यासाठी रजिताला तुला मुलांपासून वेगळे व्हावे लागेल, तरच तुझ्याशी लग्न करेल असे सांगितले होते. हे ऐकल्यानंतर रजिताने तिच्या मुलांना आणि पतीला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. रजिताने तिच्या मुलाला टॉवेलने गळा दाबून मारले. पाण्याच्या टँकर चालक म्हणून काम करणारा चेन्नईया उशिरा घरी परतला. तेव्हा रजिताने त्याला सांगितले माझ्या पोटात खूप दुखत आहे. दही भात खाल्यामुळे माझी आणि मुलांची तब्येत बिघडली असेही तिने सांगितले. त्यानंतर चेन्नईया आणि आजूबाजूच्या लोकांनी मुलांसह रजिताला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.
पोलिसांनी रजिताकडे कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. रजिताने कबुल केले की तिनेच तिच्या तीन मुलांचा गळा दाबून खून केला होता. तीन मुलांपैकी एक १२ वर्षांचा, दुसरा १० वर्षांचा आणि तिसरा ८ वर्षांचा होता. यानंतर पोलिसांनी शिवकुमार आणि रजिताला अटक केली आहे.