will make big announcements for jammu kashmir and ladakh soon says reliance chairman mukesh ambani in agm | Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

मुंबई: रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये जिओ, तेल क्षेत्रासोबतच अनेक घोषणांचा समावेश होता. मोदी सरकारनं केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिलेल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलही अंबानींनी मोठे संकेत दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च रिलायन्सकडून केला जाणार असल्याचं अंबानी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलचा दृष्टीकोन पाहता आमच्या कंपनीनं त्या भागात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. यासाठी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली असून याबद्दलची योजना लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अंबानी यांनी सांगितलं. 'पुलवामातील हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या जवानांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च रिलायन्स करेल,' असं ते म्हणाले. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

रिलायन्सच्या वार्षिक सभेत बोलताना अंबानी यांनी मोदी सरकारसाठी जोरदार बॅटिंग केली. गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्याचीदेखील घोषणा केली. याबद्दल अंबानींनी मोदी सरकारचं कौतुक केलं. मोदींनी 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. याबद्दलचा उल्लेखदेखील त्यांनी वारंवार केला आहे. 5 ट्रिलियनचं ध्येय गाठणं शक्य असून त्यात रिलायन्स मोठी भूमिका बजावेल, असं अंबानी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ तात्पुरत्या स्वरुपाची असून देश लवकरच घोडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

Web Title: will make big announcements for jammu kashmir and ladakh soon says reliance chairman mukesh ambani in agm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.