बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:21 IST2025-11-15T17:19:52+5:302025-11-15T17:21:18+5:30
नीतीश कुमार हेच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे जेडीयूने स्पष्ट केले आहे. तर भाजपने मात्र थेट नाव घेतलेले नाही. यामुळे मुख्यमंत्रीपदासंदर्भात थोडा सस्पेंन्स निर्माण झाला आहे.

बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) प्रचंड बहुमत मिळाले आहे. यानंतर आता नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नीतीश कुमार हेच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे जेडीयूने स्पष्ट केले आहे. तर भाजपने मात्र थेट नाव घेतलेले नाही. यामुळे मुख्यमंत्रीपदासंदर्भात थोडा सस्पेंन्स निर्माण झाला आहे.
निकालानंतर, शुक्रवारी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या निवासस्थानी राजकीय हालचाली वाढल्याचे दिसून येते. केंद्रीय मंत्री ललन सिंह, जेडीयूचे कार्याध्यक्ष संजय झा, वरिष्ठ नेते विजय चौधरी तसेच श्याम रजक यांनी नीतीश कुमार यांची भेट घेतली. यानंतर, ललन सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी, "बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाची कोणतीही जागा रिक्त नाही," असे त्यांनी संपष्ट केले. तसेच, नीतीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे श्याम रजक म्हटले आहे.
भाजपची भूमिका काय? -
दुसरीकडे, भाजप मात्र नीतीश कुमार यांचे नावावर स्पष्टपणे घेणे टाळत असल्याचे दिसते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले, "आगामी एक-दोन दिवस पक्ष जनतेचे आभार मानण्यासाठी कार्यक्रम करेल. त्यानंतर सर्व पक्षांचे आमदार आपापले नेते निवडतील आणि मग एनडीएचे आमदार एकत्रितपणे आपला नेता निश्चित करतील."
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार का? यावर बोलताना जायसवाल म्हणाले, "हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल." याशिवाय, बिहार निवडणुकीचे भाजप प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर नीतीश यांचे नाव घेणे टाळले. तसेच, 'पुढील मुख्यमंत्री एनडीएचाच असेल,' असे ते म्हणाले. यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम आहे.
या निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने समान जागांवर निवडणूक लढवली होती. यात भाजपला 89 तर 85 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय, लोजपा-आरला 19, हमला 5 तर रालोमोला 4 जागा मिळाल्या आहेत. एकूण एनडीएचा विचार करता, एनडीएने 243 पैकी 202 जागा जिंकल्या आहेत.