सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 22:58 IST2025-08-17T22:57:13+5:302025-08-17T22:58:25+5:30

२००४ ते २००७ या काळात सी.पी. राधाकृष्णन तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष राहिले आहेत. या पदावर असताना त्यांनी १९ हजार किमी रथ यात्रा काढली होती.

What is BJP's plan behind making C.P. Radhakrishnan its Vice Presidential candidate? | सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या

सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या

नवी दिल्ली -  महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांना भारतीय जनता पार्टीने एनडीएकडून उपराष्ट्रपति‍पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत राधाकृष्णन यांच्या नावाला पसंती देण्यात आली. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री जे.पी. नड्डा यांनी सी.पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. ३१ जुलै २०२४ रोजी सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या नियुक्तीच्या आधी ते झारखंडचे राज्यपाल म्हणून काम करत होते. 

सी.पी राधाकृष्णन यांचे नाव का?

गेल्या ४ दशकांहून अधिक अनुभव असलेले राधाकृष्णन तामिळनाडूच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचा चेहरा आहे. चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ साली तामिळनाडूच्या तिरुपूर येथे झाला. राधाकृष्णन यांनी बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सुरुवातीपासून ते काम करत असताना १९७४ साली भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य बनले होते.  १९९६ साली राधाकृष्णन यांची भाजपाच्या तामिळनाडू राज्य सचिवपदी नियुक्ती केली गेली. १९९८ मध्ये पहिल्यांदा ते कोयंबटूरहून लोकसभा निवडणुकीत जिंकले. १९९९ साली पुन्हा ते लोकसभेत निवडून आले होते. 

अनेक संसदीय समितीत सदस्य राहिलेत...

सी.पी राधाकृष्णन यांनी त्यांच्या खासदार कार्यकाळात वस्त्रसंबंधित संसदीय स्थायी समितीत अध्यक्ष म्हणून काम केले. सार्वजनिक क्षेत्र पीएसयू संसदीय समिती, वित्त समितीतही ते सदस्य राहिले होते. स्टॉक एक्सचेंज घोटाळ्यात तपास करणाऱ्या संसदीय विशेष समितीचेही ते सदस्य होते. २००४ साली राधाकृष्णन यांनी संसदीय प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेत संबोधित केले होते. तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. 

तामिळनाडूत भाजपाचा चेहरा

२००४ ते २००७ या काळात सी.पी. राधाकृष्णन तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष राहिले आहेत. या पदावर असताना त्यांनी १९ हजार किमी रथ यात्रा काढली होती, जी ९३ दिवस चालली होती. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय नदी जोड, दहशतवाला उत्तर देणे, समान नागरी कायदा लागू करणे, अस्पृश्यता निवारण, ड्रग्सविरोधी कायदे यासारख्या विविध मागण्या केल्या होत्या. २०१६ साली राधाकृष्णन यांना कोच्ची येथील कॉयर बोर्डाचे अध्यक्ष नियुक्त केले होते. ४ वर्ष ते त्या पदावर राहिले. २०२० ते २०२२ या काळात ते केरळ भाजपाचे प्रभारी होते. 

भाजपाची वैचारिक पार्श्वभूमी लक्षात घेता सी.पी राधाकृष्णन यांच्या नावाला पसंती दिली गेली. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाला पुन्हा तीच चूक करायची नव्हती. जगदीप धनखड हे भाजपा विचारांमधून पुढे आले नव्हते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात जनता दलातून झाली, त्यानंतर ते काँग्रेसमध्येही होते. मग भाजपात प्रवेश घेतला. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील होते, त्यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. सी.पी राधाकृष्ण संघ विचारांचे आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपा तामिळनाडू आणि दक्षिणेतील दुसऱ्या राज्यांमध्ये पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभा निवडणूक होईल. तिथे एनडीएचे सरकार यावे, भाजपा सत्तेत राहावी असा नेत्यांचा प्रयत्न आहे. 

Web Title: What is BJP's plan behind making C.P. Radhakrishnan its Vice Presidential candidate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.