बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:06 IST2025-11-14T15:05:02+5:302025-11-14T15:06:41+5:30
Tejashwi Yadav Lalu Prasad Yadav Bihar Election Failure: तेजस्वी यादवांवर आज जी वेळ आली तशीच वेळ त्यांच्या वडिलांवरही आली होती

बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
Tejashwi Yadav Lalu Prasad Yadav Bihar Election Failure: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास निश्चित झाले आहेत. दुपारी १ वाजेपर्यंतचे ट्रेंड आणि निकाल एनडीएला मोठा विजय मिळवून देणारे दिसले. राज्यातील २४३ विधानसभा जागांपैकी NDA १९०-१९९ जागांवर आघाडीवर आहे, तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीला (ग्रँड अलायन्स) मोठा फटका बसला. महाआघाडीने ५० जागांचा टप्पाही ओलांडला नाही. काँग्रेस-आरजेडी महागठबंधनकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेल्या तेजस्वी यादव यांना मोठा दणका बसला. २०२५ मध्ये एनडीएचा झालेला हा विजय २०१०च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांची आठवण करून देतो. ही निवडणूक अशी होती, ज्यामध्ये भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूने उल्लेखनीय कामगिरी करत लालू प्रसाद यादवांना मात दिली होती. (Bihar Assembly Election 2025)
२०१० मध्ये काय घडलं होतं?
२०१०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष एनडीएचा भाग होता. जागावाटपात जेडीयूने १४१ जागा लढवल्या होत्या, तर भाजपने १०२ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत सुशील कुमार मोदी बिहार भाजपचा एक प्रमुख चेहरा होते. लालू प्रसाद यादव यांच्या राजदने १६८ जागा लढवल्या आणि रामविलास पासवान यांच्या लोजपाने ७५ जागा लढवल्या होत्या. राज्यातील सर्व २४३ जागांवर काँग्रेसने स्वतःहून उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत महाआघाडी नव्हती. फक्त राजद आणि लोजपा यांच्यातच आघाडी होती. त्यावेळी रामविलास पासवान हे लोजपाचे प्रमुख होते आणि त्यांनी लालू यादव यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला.
एनडीएने जिंकल्या होत्या २०६ जागा
निवडणूक निकालांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, एनडीएने विक्रमी २०६ जागा जिंकल्या होत्या, तर विरोधी आरजेडी, एलजेपी आणि काँग्रेसला फक्त २५ जागांवर समाधान मानावे लागले होते. जेडीयूने ११५ जागा जिंकल्या, तर भाजपने ९१ जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, आरजेडीने २२ जागा, एलजेपीने तीन आणि काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या. इतर जागांमध्ये, सीपीआयने एक, आयएनडीने सहा आणि झामुमोने एक जागा जिंकली. अशाप्रकारे, २०१० च्या निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला होता, तर विरोधी पक्ष ५०च्या पुढेही जाऊ शकला नव्हता. आज तशाच प्रकारच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली.
लालू प्रसाद यादव राजकारणापासून दूर
२०१० हा काळ असा होता जेव्हा लालू यादव बिहारच्या राजकारणात सक्रिय होते. त्यावेळी तेजस्वी यादव राजकारणात नवीन होते. सध्या वय, असंख्य आरोप आणि शिक्षेमुळे लालू यादव राजकारणापासून दूर आहेत. त्यांचा राजकीय सहभाग आता त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित आहेत. तेजस्वी यादव यांनी यंदा पक्षाच्या तिकीट वाटपापासून ते राजकीय रणनीतीपर्यंत सर्व गोष्टींसाठी जबाबदार होते. काही सार्वजनिक सभा वगळता, लालू यादव प्रचारापासून मोठ्या प्रमाणात दूर होते. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी तेजस्वी यादव यांनी घेतली होती.