झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 05:23 IST2025-10-25T05:21:30+5:302025-10-25T05:23:57+5:30
सिंगापूर पोलिस गायक झुबीन गर्गच्या मृत्यूशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह महत्त्वाचे पुरावे पुढील १० दिवसांत देईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली.

झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क, गुवाहाटी: सिंगापूरपोलिस दल गायक झुबीन गर्गच्या मृत्यूशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह महत्त्वाचे पुरावे पुढील १० दिवसांत देईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. सीआयडीचे विशेष डीजीपी मुन्ना प्रसाद गुप्ता म्हणाले की, आसाम पोलिसांनी सिंगापूर पोलिसांना तपास वेळेवर पूर्ण करण्यासाठी सर्व माहिती प्रदान करण्याची विनंती केली आहे.
गुप्ता आणि टिटाबोरचे सहायक जिल्हा पोलिस अधीक्षक तरुण गोयल हे गायकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी चार दिवसांपूर्वी सिंगापूरला गेले होते, ते गुरुवारी परतले. गुप्ता एसआयटीचे नेतृत्व करत आहेत, तर गोयल हे प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या नऊ सदस्यांच्या पथकाचे सदस्य आहेत.
गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तांना भेटलो आणि आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर मदतीबद्दल चर्चा केली. आम्ही सिंगापूर पोलिसांच्या पाच सदस्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाशीही चर्चा केली. दोन्ही पोलिस दलांनी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तपासावर चर्चा केली आणि प्रकरणाशी संबंधित माहितीची देवाणघेवाण केली.