घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:05 IST2025-05-05T12:59:46+5:302025-05-05T13:05:28+5:30

घरातील शौचलयात असलेल्या कमोड सीटचा स्फोट होऊन एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे.

Western Toilet Seat Blast 20 Years Old Boy Injured In commode Explosion at toilet in home | घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!

घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!

Western Toilet Seat Blast UP : घरात शौचालय असणं सगळ्यांसाठीच अगदी सोयीचं आहे. पण, यामुळेच आता एका कुटुंबात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. घरातील शौचलयात असलेल्या कमोड सीटचा स्फोट होऊन एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील बीटा दो कोतवाली या परिसरात सदर घटना घडली आहे. या परिसरात राहणार्‍या एका कुटुंबाच्या घरात असलेल्या वेस्टर्न टॉयलेट सीटचा स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जिम्स रुग्णालयात भारती करण्यात आले आहे. 

सेक्टर ३६मधील सी-३६४ क्रमांकाच्या घरात सुनील प्रधान राहतात. त्यांच्या घरात हे वेस्टर्न पद्धतीचे शौचालय बांधण्यात आले होते. या स्फोटात जखमी झालेल्या तरुणाच्या कुटुंबाने मिथेन गॅसमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही अधिकची माहिती दिलेली नाही. 

नेमकं काय घडलं? 
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सुनील यांचा मुलगा आशू याने शौचालयाचा वापर केला. यानंतर त्याने पाणी टाकण्यासाठी फ्लश दाबताच मोठ्याने स्फोट झाला आणि कमोड सीट तुटून पडली. या स्फोटात लागलेल्या आगीमुळे आशुचा चेहरा, हात, पाय भाजले आहेत. तर, कमोडची सीट फुटून, त्याचे काही तुकडे त्याच्या शरीरात रुतले आहेत. स्फोटाचा आवाज आणि आशुची किंकाळी ऐकताच कुटुंबीयांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. कुटुंबाने आशुला या आगीतून बाहेर काढून, तातडीने रुग्णालयात दाखल केले.

या घटनेबद्दल माहिती देताना सुनील प्रधान यांनी शौचलयात मिथेन वायू साचल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, "शौचालय आणि स्वयंपाकघराच्या दरम्यान असलेल्या शाफ्टमध्ये एसीचा एक्झॉस्ट लावलेला आहे. या शौचालयाचा नियमित वापर केला जात होता. त्यामुळे हा स्फोट नेमका कशामुळे झाला,याचा सखोल तपास झालाच पाहिजे."

ग्रेटर नोएडाची सांडपाणी व्यवस्था ढिसाळ!
अॅक्टिव सिटीजन टीमचे हरेंद्र भाटी यांनी या घटनेमागील कारणांची मीमांसा करताना म्हटले की, "ग्रेटर नोएडाची सांडपाणी व्यवस्था कोलमडून गेली आहे. पूर्वी प्रत्येक शौचालयात एक व्हेंट पाईप बसवण्यात यायचा. या पाईपमधून मिथेन वायू वातावरणात सोडला जायचा, ज्यामुळे कधीच कोणतेही नुकसान होत नव्हते. मात्र, सध्या या पाईप पद्धतीचा वापर कमी झाला आहे. यामुळे मिथेन वायू साठून राहतो, ज्यामुळे अशा घटना घडू शकतात."

या परिसरातील लोकांनी सदरची घटना म्हणजे प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. गेल्या दीड वर्षांपासून या परिसरातील गटारे आणि सांडपाणी वाहून नेणारी पाईप लाईन फुटली आहे. या गटारांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा तक्रारी केल्या गेल्या आहेत. मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. "अशाप्रकारची ही पहिलीच घटना असून, याचा सखोल तपास केला जाईल आणि या मागची करणे देखील शोधली जातील", असे ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्या एसीओ श्रीलक्ष्मी व्हीएस यांनी म्हटले आहे.

Web Title: Western Toilet Seat Blast 20 Years Old Boy Injured In commode Explosion at toilet in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.