बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 21:46 IST2025-11-22T21:45:02+5:302025-11-22T21:46:00+5:30
West Bengal Voters Hike: मतदारांच्या संख्येत तब्बल ६६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीवरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस हे विरोधी पक्ष आमनेसामने आले आहेत.

बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
पश्चिम बंगालमध्येबांगलादेश सीमेला लागून असलेल्या नऊ जिल्ह्यांमधील नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २००२ मध्ये राज्यात एकूण ४.१५ कोटी मतदार होते, ही संख्या आता ७.६३ कोटी झाली आहे. म्हणजेच मतदारांच्या संख्येत तब्बल ६६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीवरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस हे विरोधी पक्ष आमनेसामने आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बंगालमधील उत्तर दिनाजपूर, मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर २४ परगणा, दक्षिण २४ परगणा, जलपाईगुडी, कूचबिहार, नदिया आणि दक्षिण दिनाजपूर या बांगलादेश सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
भाजपचा आरोप
भाजपचे ज्येष्ठ नेते राहुल सिन्हा यांनी या वाढीसाठी थेट बांगलादेशातून होणाऱ्या मुस्लिम घुसखोरीला जबाबदार धरले आहे. तृणमूल काँग्रेस व्होट बँकेच्या राजकारणातून घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आणि त्यामुळे हे जिल्हे पूर्णपणे मुस्लिमबहुल होण्याची भीती असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
टीएमसीचा दावा
या आरोपांना प्रत्युत्तर देताना तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते अरूप चक्रवर्ती यांनी हा आरोप निराधार ठरवला. त्यांनी म्हटले की, बांगलादेशात हिंदू लोकसंख्या ८ टक्क्यांनी कमी झाली आहे, याचा अर्थ तेथील हिंदू निर्वासित मोठ्या संख्येने बंगालमध्ये आले आहेत आणि त्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. टीएमसीने भाजपवर साम्प्रदायिक राजकारण करत असल्याचा प्रति-आरोप केला आहे.
माकपची भूमिका
माकपचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद सलीम यांनी घुसखोरीचा मुद्दा मान्य करत, सीमा सुरक्षा दलाने सीमावर्ती भागातील पाळत अधिक कडक करायला हवी होती, असे मत व्यक्त केले.