SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 20:00 IST2025-12-01T19:59:54+5:302025-12-01T20:00:30+5:30
West Bengal SIR: कोलकात्यात शेकडो BLO नी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
West Bengal SIR: देशातील 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 4 नोव्हेंबरपासून मतदारांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या या मतदार यादी दुरुस्ती (SIR) प्रक्रियेचा देशभरातून विरोध होतोय. सोमवारी संसदेपासून ते रस्त्यापर्यंत याला तीव्र विरोध पाहायला मिळाला. एकीकडे संसदेत विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला, तर दुसरीकडे पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात बुथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर BLO चे आंदोलन
कोलकात्यात शेकडो BLO नी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. त्यांनी कार्यालयाचा घेराव केला आणि परिसरात घुसण्याचाही प्रयत्न केला. SIR प्रक्रियेविरोधात पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापले असून, BLO चे हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पाहायला मिळाले.
#WATCH | Kolkata, West Bengal: Booth Level Officers (BLOs) engaged in SIR exercise hold a protest outside the office of the Election Commission. pic.twitter.com/47xOqI35FU
— ANI (@ANI) December 1, 2025
BLO आंदोलन का करत आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक BLO हे BLO अधिकार रक्षा समितीशी संलग्न आहेत. ते BLO साठी चांगल्या कामकाजाच्या अटी, सुरक्षितता आणि योग्य सुविधा यांची मागणी करत आहेत. समितीने प्रशासनावर आरोप केला आहे की, SIR दरम्यान BLO वर अनावश्यक दबाव आणला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, SIR प्रक्रियेची सुरुवात झाल्यापासून देशभरात अनेक BLO चा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भाजपचा पलटवार
या आंदोलनावर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष भाजपनेही प्रतिक्रिया दिली. सुवेंदु अधिकारी यांनी दावा केला की, कोलकात्यात आंदोलन करणारे BLO नसून टीएमसीचे कॅडर आहेत. तर भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी म्हटले की, SIR वरून ममता बॅनर्जी देश हादरवण्याची भाषा करत आहेत, पण 2026 च्या निवडणुकीत बंगालच त्यांना हादरवेल.