Amit Shah : "मी १५ दिवस बंगालमध्येच राहणार, ममता बॅनर्जींना 'बाय-बाय'..."; अमित शाह कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:19 IST2026-04-02T13:16:37+5:302026-04-02T13:19:47+5:30
Amit Shah And Mamata Banerjee : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Amit Shah : "मी १५ दिवस बंगालमध्येच राहणार, ममता बॅनर्जींना 'बाय-बाय'..."; अमित शाह कडाडले
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या आधी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत सत्ताधारी टीएमसी (TMC) आणि मुख्य विरोधी पक्ष भाजपा यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शुभेंदु अधिकारी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने नंदीग्राममध्ये पोहोचलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत मोठी घोषणा केली आहे. १५ दिवस आपण पश्चिम बंगालमध्येच राहून निवडणुकीची धुरा सांभाळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
गुरुवारी अमित शाह विशेषतः शुभेंदु अधिकारी यांच्या नामांकनासाठी नंदीग्रामला पोहोचले होते. तिथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, "मी बंगाल निवडणुकीसाठी १५ दिवस बंगालमध्येच राहणार आहे. मी येथे खास करून शुभेंदु अधिकारी यांच्या उमेदवारी अर्जासाठी आलो आहे. शुभेंदु यांचा विजय बंगालमध्ये परिवर्तनाचा पाया रचेल."
"ममता बॅनर्जींना बाय-बाय करा"
अमित शाह यांनी असा दावा केला की, "मी संपूर्ण बंगालचा दौरा केला असून मी जिथे कुठे जातो, तिथे एकच आवाज घुमत आहे - ममता बॅनर्जींना 'बाय-बाय' करा. निवडणुकीपूर्वी बंगालच्या कानाकोपऱ्यात लोक हेच म्हणत आहेत की, हे सरकार आता जाऊ द्या आणि ममता बॅनर्जींना बाय-बाय करा."
"जनता टीएमसीच्या गुंडगिरीला पूर्णपणे वैतागली"
बंगालच्या ज्वलंत समस्या मांडताना गृहमंत्री म्हणाले की, बंगालची जनता टीएमसीच्या गुंडगिरीला पूर्णपणे वैतागली आहे. वारंवार होणारे बॉम्बस्फोट आणि बेरोजगारीमुळे तरुण त्रस्त आहेत. राज्यातील वारंवार होणाऱ्या बॉम्बस्फोटांनी सुरक्षा यंत्रणा कोलमडून टाकली आहे. तरुणांना आश्वासन दिलं की, भाजपा सरकार बेरोजगारी दूर करेल आणि विकासाची नवी लाट आणेल, जेणेकरून बंगाल आपली पूर्वीची ओळख पुन्हा मिळवू शकेल.