"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:19 IST2025-05-19T08:14:32+5:302025-05-19T08:19:04+5:30

ज्योतीच्या हालचाली संशयास्पद असल्याचा संशय आधीच एका व्यक्तीला आला होता, ज्याचे ट्विट आता व्हायरल होत आहे.

"Went to Pakistan 10 days ago, now to Kashmir..."; Suspicions already arise about Jyoti's movements! | "१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!

"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!

हरियाणाच्या 'ट्रॅव्हल विथ जो' या लोकप्रिय यूट्यूब चॅनलसाठी ओळखली जाणारी व्लॉगर ज्योती मल्होत्रा सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिला अटक झाली असून, तिच्याबद्दल आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्योतीच्या हालचाली संशयास्पद असल्याचा संशय आधीच एका व्यक्तीला आला होता, ज्याचे ट्विट आता व्हायरल होत आहे.

आधीच मिळाला होता इशारा, पण दुर्लक्ष?
नवीन खुलास्यानुसार, १० मे २०२४ रोजी कपिल जैन नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने प्लॅटफॉर्म एक्सवर ज्योतीच्या संशयास्पद हालचालींबद्दल इशारा दिला होता. या पोस्टमध्ये त्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) टॅग करून तिच्यावर लक्ष ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. "ज्योती पाकिस्तानी दूतावासाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती, त्यानंतर पाकिस्तानात १० दिवस होती, आणि आता काश्मीर दौऱ्यावर आहे," असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते.

पहलगाम हल्ल्याशी संबंध?
ज्योतीची अटक पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान झाली आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान, तिच्या पाकिस्तान दौऱ्यांची आणि पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाची माहिती समोर आली.

पाकिस्तान दौऱ्यांमधून वाढले संशय
तपासात उघड झाले आहे की, २०२३मध्ये ज्योती दोनदा पाकिस्तानात गेली होती. त्या वेळी तिने दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील अधिकारी एहसान-उर-रहीम यांच्यासह इतर गुप्तचर एजंट्सशी संपर्क साधला होता. अली अहवान नावाच्या व्यक्तीने तिच्या पाकिस्तानातील वास्तव्याची व्यवस्था केली होती, आणि तिची शकीर व राणा शाहबाज यांच्याशी भेट घडवून दिली होती. विशेष म्हणजे, ज्योतीने शाहबाजचा नंबर मुद्दाम चुकीच्या नावाने फोनमध्ये सेव्ह केला होता, जेणेकरून त्याच्यासंबंधित माहिती लपवता येईल.

सोशल मीडियावर व्हायरल
कपिल जैन यांची एक वर्षांपूर्वीची पोस्ट नुकतीच पुन्हा समोर आली असून, सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स आता या पोस्टवर कमेंट करत वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत.

Web Title: "Went to Pakistan 10 days ago, now to Kashmir..."; Suspicions already arise about Jyoti's movements!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.