हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 18:01 IST2025-08-15T17:57:40+5:302025-08-15T18:01:33+5:30
दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायू मकबऱ्यामध्ये शुक्रवारी अपघात झाला. मकबऱ्यात असलेल्या एका खोलीची भिंत कोसळली.

हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या पावसामुळे काही दुर्दैवी घटना घडल्या असून, त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याची काम हाती घेण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भिंत कोसळून ७ ते ८ लोक दबले गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. दिल्लीतील अग्निशामक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सायंकाळी ४.३० वाजता नियंत्रण कक्षात कॉल करून या घटनेची माहिती दिली गेली.
भिंत कोसळल्याची माहिती मिळताच तातडीने ५ फायर टेंडर घटनास्थळी पाठवण्यात आले. शोध आणि मदत कार्य सुरू करण्यात आले. भिंतीखाली दबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
#WATCH | Delhi | Portion of the roof of a room at Dargah Sharif Patte Shah, located in the Nizamuddin area, collapses; Police and Fire Department personnel on the spot; Area cordoned off pic.twitter.com/dMAEcJrlQn
— ANI (@ANI) August 15, 2025
हुमायूं मकबऱ्यामध्ये असलेल्या एका खोलीची भिंत कोसळली. हा मकबरा प्राचीन असून, १६व्या शतकाच्या मध्यात बांधला गेलेला आहे. हा मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, सध्या पाऊस असल्याने गर्दी कमी आहे.
झाड कोसळून एकाचा मृत्यू
दिल्लीतील कालकाजी भागात गुरुवारी दुपारी झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुचाकीवरून मुलीसह घरी निघालेल्या वडिलांचा झाड अंगावर पडल्याने मृत्यू झाला.
झाड मोठे असल्याने अनेक वाहनेही त्याखाली दबली गेली होती. काही जण या घटनेत जखमी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने झाड तोडून झाडाखाली दबलेल्या लोकांना आणि वाहनांना बाहेर काढले.