इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 22:34 IST2025-11-24T22:34:03+5:302025-11-24T22:34:17+5:30
गुजरात-राजस्थानमार्गे दिल्ली-NCR व पंजाबवर प्रभाव.

इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
Ethiopian Volcanic Eruption : इथिओपिया देशातील हेले गुब्बी ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला. मागील दहा हजार वर्षांमध्ये इथिओपियामध्ये अशी ही पहिलीच घटना घडली आहे. दरम्यान, या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात पसरलेली राख आता भारताकडे सरकत आहे आणि त्याचा दिल्ली-एनसीआरवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, राखेचा ढग गुजरातमार्गे राजस्थान, दिल्ली-NCR आणि पंजाबपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या राखेमुळे देशातील हवाई प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच, आवश्यकता वाटल्यास ऑपरेशन तात्पुरते थांबवण्याचेही निर्देशही देण्यात आले आहेत.
Directorate General of Civil Aviation (DGCA) has issued an advisory to airlines asking them to avoid altitudes and regions affected due to the volcanic ash after Ethiopia’s Hayli Gubbin eruption on Sunday. Airports told to inspect runways for contamination and suspend operations…
— ANI (@ANI) November 24, 2025
स्रोतांच्या माहितीनुसार, काही विमान कंपन्यांनी दुपारपासूनच फ्लाइट्स रद्द करण्यास सुरुवात केली आहे. रद्द झालेल्या फ्लाइट्सपैकी एक मुंबईहून निघणारी होती, तर इतर दक्षिणेकडील मार्गांवरील होत्या.
भारतावर कसा होणार परिणाम?
हवामान खात्याच्या माहितीनुसार राखेचा ढग 10-15 किमी उंचीवर आहे. ढगात ज्वालामुखीय राख, सल्फर डायऑक्साइड आणि सूक्ष्म खडककण आहेत. याचा मुख्य परिणाम हवाई वाहतुकीवर होणार आहे. जमिनीवर किंवा सर्वसाधारण लोकांच्या आरोग्यावर तात्काळ मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. या राखेमुळे आकाश ढगाळ आणि धूसर दिसेल, परंतु परिस्थिती काही तासानंतर सामान्य होईल.