बंगळुरूतील शेषाद्रिपुरम येथील एका प्रसिद्ध कॉफी शॉपधील कर्मचाऱ्यांना चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. कॉफी शॉपमधील कर्मचाऱ्याने कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण केल्याची सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६:५० च्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा आरोपी कॉफी शॉपमध्ये आले होती. ऑर्डर मिळाल्यानंतर काही वेळातच आरोपींनी कॉफी शॉपमधील कर्मचाऱ्याला एक्स्ट्रा कप मागितला. परंतु, कर्मचाऱ्याने त्यांना एक्स्ट्रा कप देता येत नाही. त्याऐवजी आणखी एक कॉफी घ्या, असे म्हटले. मात्र, नंतर वादाला सुरुवात झाली आणि आरोपींनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपींमधील एका व्यक्तीने कर्मचाऱ्याला चापट मारली. त्यानंतर त्याच्या इतर साथीदारांनीही कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॉफी शॉपमधील लोकांनी हस्तक्षेप करून आरोपींना कर्मचाऱ्यांपासून वेगळे केल्याने हाणामारी आणखी वाढली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेषाद्रीपुरम पोलिसांनी आरोपींविरोधात औपचारिक तक्रार दाखलकेली. आरोपींची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.