"लोक एकमेकांवर पडले", शीतला मंदिरात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:12 IST2026-03-31T12:11:51+5:302026-03-31T12:12:35+5:30
शीतला मंदिरात मंगळवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

"लोक एकमेकांवर पडले", शीतला मंदिरात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
बिहारच्या नालंदा येथील मघडा शीतला मंदिरात मंगळवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सांगितलं की, ते आज शीतला देवीच्या दर्शनासाठी पाटण्याहून आले होते. मंदिर परिसरात अचानक गोंधळ उडाला आणि लोक एकमेकांवर पडू लागले, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रशासकीय नियोजनातील त्रुटींमुळेच हा मोठा अपघात घडल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
पाटण्याहून आलेल्या ममता यांनी सांगितलं की, "मी दर्शनासाठी आले होते, पण दर्शन होऊ शकलं नाही. येथे दर मंगळवारी जत्रा भरते, तरीही प्रशासनाची कोणतीही तयारी नव्हती. पाच जणांचा मृत्यू झाल्याचं मी ऐकलं आहे, अनेक जण यामध्ये गंभीर जखमी आहेत आणि रुग्णवाहिका त्यांना उपचारासाठी घेऊन गेल्या आहेत."
दुसरी प्रत्यक्षदर्शी रीना राय यांनी सांगितलं की, "आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा कळलं की काही लोक बेशुद्ध झाले आहेत तर काही जण चेंगराचेंगरीत जखमी आहेत. चेंगराचेंगरी होण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणालाही रांगेत उभं राहायचं नव्हतं. 'आधी मी, आधी मी' अशा घाईमुळे हा मोठा अनर्थ घडला आहे."
#WATCH नालंदा, बिहार: ममता देवी नाम की एक श्रद्धालु ने बताया, "मंगलवार को यहां हमेशा भीड़ रहती है। लोग शीतला माता के दर्शन के लिए आते हैं। हमलोग भी पटना से दर्शन के लिए आए हैं। लेकिन अचानक भगदड़ मच गई, और लोगों की जान चली गई। यह सब कुप्रबंधन की वजह से हुआ... यहां बहुत ज़्यादा… pic.twitter.com/xjLrrfHSpm
— ANI_HindiNews (@AHindinews) March 31, 2026
घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आलं असून पाच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविक जागीच बेशुद्ध होऊन पडले होते. एसडीएम (SDM) स्वतः घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
Video - भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी
मिळालेल्या अपडेटनुसार, उपचारादरम्यान आणखी दोन महिलांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ८ वर पोहोचली आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक मृतांची ओळख पटवण्याचं काम करत आहेत, तर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.