निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:12 IST2025-07-23T14:11:58+5:302025-07-23T14:12:25+5:30
Vice President elections: निवडणूक आयोगाने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
Vice President elections: जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाने आज (२३ जुलै) एक प्रेस रिलीज जारी करुन ही माहिती दिली. आयोगाने सांगितले की, गृह मंत्रालयाने २२ जुलै रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. त्यामुळे आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
भारताचे मावळते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. संविधानाच्या कलम ६८ अंतर्गत, उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे, नियमांनुसार ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी लागते. या संदर्भात, निवडणूक आयोगाने आता एक अधिसूचना जारी केली आहे.
Election to the Office of #VicePresident of India – Process started by #ECI
— Election Commission of India (@ECISVEEP) July 23, 2025
Read more : https://t.co/Vp25gyF6nopic.twitter.com/0xBtFzzGcO
उपराष्ट्रपती कोण निवडतो
उपराष्ट्रपतीची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा आणि राज्यसभा) निवडून आलेले आणि नामांकित सदस्य असतात. जर आपण नामांकनाबद्दल बोललो तर, उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला किमान २० प्रस्तावक आणि २० समर्थक (निर्वाचक मंडळाचे सदस्य) यांचे समर्थन आवश्यक असते. त्यांना नामांकनासोबत ५०,००० रुपयांची सुरक्षा रक्कम देखील जमा करावी लागते.
उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची पात्रता
उमेदवार भारताचा नागरिक असावा.
वय किमान ३५ वर्षे असावे.
तो राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा.
तो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा केंद्र/राज्य सरकारचे मंत्री पद वगळता कोणतेही लाभाचे पद धारण करू शकत नाही.
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला?
जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण सांगत राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यावर विरोधकांकडून वेगळाच संशय व्यक्त होतोय. सरकारसोबत वाद झाल्यामुळे राजीनामा दिल्याचे विरोधक म्हणत आहेत. मात्र, यावर अद्याप सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.