उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:06 IST2025-08-24T15:06:26+5:302025-08-24T15:06:45+5:30
Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फक्त दोन उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
Vice President Election : भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी लवकरच निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एनडीएकडून सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघांसोबत एकूण ६८ अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, या अर्जाच्या छाननीदरम्यान खासदारांची बनावट स्वाक्षरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
२१ ऑगस्ट ही उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकनाची शेवटची तारीख होती. तोपर्यंत ४६ उमेदवारांनी ६८ नामांकन अर्ज दाखल केले. सुरुवातीला १९ उमेदवारांचे २८ अर्ज नाकारण्यात आले. उर्वरित २७ उमेदवारांच्या ४० अर्जांची छाननी २२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. यादरम्यान, केरळच्या जोमोन जोसेफ यांच्या नामांकनाबाबत बनावट स्वाक्षरीचा प्रकार समोर आला आहे.
अर्जावर खासदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरण्यात
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी फक्त दोन अर्ज वैध आहेत. हे अर्ज सी पी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांचे आहेत. परंतु जोसेफ यांच्या अर्जाच्या छाननीदरम्यान, बनावट स्वाक्षरीचा प्रकार उघडकीस आला. जोसेफ यांच्या अर्जाला २२ प्रस्तावक आणि २२ समर्थकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची नावे आणि स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे.
मात्र, हा अर्ज नाकारण्यात आला आहे. या खासदारांची नावे त्यांना न कळवता लिहिली असून, स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. अनेक खासदारांनी पुष्टी केली की, त्यांनी जोसेफ यांच्या अर्जावर स्वाक्षरी केलीच नाही. विशेष म्हणजे, यामध्ये सध्या तुरुंगात असलेले वायएसआरसीपीचे खासदार मिधुन रेड्डी यांची स्वाक्षरी देखील दिसून येते. बहुतांश अर्जदारांचे अर्ज नाकारल्यामुळे या निवडणुकीत फक्त दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
निवडणूक कधी होणार आहे?
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्याची घोषणा केली. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान ९ सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी देशाला नवीन उपराष्ट्रपती मिळतील. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट होती, तर २५ ऑगस्टपर्यंत नावे मागे घेता येतील.