उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे आज एक प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान उतरत असताना विमानतळाच्या भिंतीवर आदळून अपघातग्रस्त झाले. अपघात झाला तेव्हा विमानामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक पर्व जैन हा होता. सुदैवाने या अपघातात तो सुरक्षित असून, विमानतळावरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धनीपूर धावपट्टीवरून पायनियर एव्ही कंपनीच्या विमानामधून प्रशिक्षणार्थी वैमानिक पर्व जैन यांनी उड्डाण केले होते. त्यानंतर हे विमान विमानतळावर उतरवत असताना विमानतळाच्या भिंतीवर जाऊन आदळले. या दरम्यान, वैमानिक पर्व जैन याने बाहेर उडी मारून आपले प्राण वाचवले.
या अपघातात विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आता या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.