कार्यालयात महिलेवर गँगरेप, कवडीमोल दराने घेतली जमीन, भाजपा आमदारावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 23:35 IST2024-12-21T23:34:53+5:302024-12-21T23:35:26+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये बिल्सी येथील भाजपा आमदार हरीश शाक्य, त्यांचा भाऊ आणि पुतण्यासह एकूण १६ जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यालयात महिलेवर गँगरेप, कवडीमोल दराने घेतली जमीन, भाजपा आमदारावर गंभीर आरोप
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता असलेल्या भाजपाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये बिल्सी येथील भाजपाआमदार हरीश शाक्य, त्यांचा भाऊ आणि पुतण्यासह एकूण १६ जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपी/एमएलए सस्पेशन कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपांमध्ये सामुहिक बलात्कार, कोट्यवधीची फसवणूक आणि तक्रारकर्त्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवणे यांचा समावेश आहे.
एमपी/एमएलए कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी लीलू चौधरी यांनी ११ डिसेंबर रोजी एका ग्रामस्थाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. भाजपा आमदार हरीश शाक्य यांच्या नेतृत्वाखालील टोळी आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांवर दबाव आणून आणि धमक्या देऊन जबरदस्तीने वसुली करत असल्याचा आरोप या तक्रारीमधून करण्यात आला होता.
सदर ग्रामस्थाच्या मालकीच्या जमिनीच्या तुकड्यावरून हा वाद सुरू आहे. भाजपा आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रारकर्ता आणि त्याच्या कुटुंबावर कमी किमतीत जमीन विकण्यासाठी दबाव आणला. जेव्हा याला विरोध करण्यात आला, तेव्हा त्यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात हत्या
आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवणे आणि धमक्या देण्याचा समावेश आहे.
आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबाच्या जमिनीच्या काही भागावर अवैधरीत्या कब्जा केला. तसेच १७ सप्टेंबर रोजी ऑफिसमध्ये आपल्या पत्नीवर सामुहिक बलात्कार केला होता, असा आरोपही तक्रारदाराने केला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक बृजेश कुमार सिंह यांनी कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.