‘बाथरूममध्ये मीच आधी जाणार!’, किरकोळ वादातून भावाने केली भावाची हत्या, मध्ये आलेल्या आईलाही संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:19 IST2026-01-13T13:17:21+5:302026-01-13T13:19:00+5:30
Uttar Pradesh Crime News: हल्लीच्या काळात किरकोळ कारणावरून होणारे वाद विकोपाला जाऊन त्यातून भयंकर कृत्य घडल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथेही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

‘बाथरूममध्ये मीच आधी जाणार!’, किरकोळ वादातून भावाने केली भावाची हत्या, मध्ये आलेल्या आईलाही संपवले
हल्लीच्या काळात किरकोळ कारणावरून होणारे वाद विकोपाला जाऊन त्यातून भयंकर कृत्य घडल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथेही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे बाथरुममध्ये लघुशंकेला आधी जाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीने त्याचा सावत्र भाऊ आणि आईची हत्या केली. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मिर्झापूरमधील मडिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पटेहरा येथील राहुल गुप्ता आणि त्याचा सावत्र भाऊ आयुष गुप्ता हे एकाच घरात राहायचे. मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राहुल गुप्ता हा भाजी कापण्याचा चाकू घेऊन आला आणि त्याने आयुष याच्यावर हल्ला करून सपासप वार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आरडा ओरड ऐकून राहुल याची सावत्र आई उषा गुप्ता ही तिथे धावत आली. तेव्हा राहुलने तिच्यावरही हल्ला केला. राहुलने केलेल्या हल्ल्यात आयुष आणि उषा गुप्ता या दोघांचाही मृत्यू झाला.
धारदार हत्याराने वार करून सावत्र भाऊ आणि सावत्र आईची हत्या केल्यानंतर आरोपी राहुल याने पुरावा लपवण्यासाठी आईचा मृतदेह घराजवळच्या कालव्यात फेकला. तर भाऊ आयुष याचा मृतदेह रस्त्यावर फेकला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी आयुष गुप्ता याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर कालव्यात फेकण्यात आलेल्या उषा गुप्ता यांच्या मृतदेहाचा शोध पोलीस घेत आहेत.
या हत्याकांडाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. तसेच कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरामध्ये तळमजल्यावर सावत्र भाऊ आयुष गुप्ता यांचे कुटुंबीय आणि आई राहायचे. तर वरच्या मजल्यावर आरोपी राहुल गुप्ता राहायचा. राहुल गुप्ताच्या पत्नीने त्याला सोडलं होतं, त्यामुळे तो एकटाच राहायचा. यादरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.