शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:13 IST2025-08-28T11:10:33+5:302025-08-28T11:13:27+5:30
शाळेची फी भरण्यास उशीर झाला म्हणून इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.

शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
शाळेची फी भरण्यास उशीर झाला म्हणून इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशातील हापूर येथील एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला. विद्यार्थ्याने आपल्या वडिलांसह पोलीस ठाणे गाठून शाळेविरुद्ध कारवाईची मागणी केली. त्यानंतर एका महिला शिक्षकेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी बाबूगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या शाळेच्या शिक्षकांनी एका खोलीत बंद करून मारहाण केली, ज्यामुळे त्याच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या. विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी आणि पुतण्या याच शाळेत शिकतात. तीन मुलांपैकी एका मुलाची शाळेची फी वेळेवर भरता आली नाही म्हणून शिक्षकांनी त्याला मारहाण बेदम केली.
विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, त्यांनी गेल्या महिन्यातच शाळेत सुमारे १२ हजार रुपये फी जमा केली आणि मुलाची फी भरण्यासाठी शाळेकडून वेळ मागितला. परंतु, सोमवार, २५ ऑगस्ट रोजी शाळा बंद होताना शाळेतील शिक्षकांनी फी भरली नाही म्हणून त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यांनी असाही आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाला प्रथम शाळेच्या गॅलरीत आणि नंतर एका खोलीत बंद करून मारहाण केली. याबाबत पालकांनी जाब विचारला असता शाळा प्रशासनाने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि उडवाउडवीचे उत्तर दिली.
३ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठून त्यांच्या मुलासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका महिला शिक्षिकेसह तीन जणांविरोधात बीएनएसच्या कलम ११५ (२) आणि १२७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.