वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:07 IST2025-05-24T16:06:42+5:302025-05-24T16:07:06+5:30
IPS Bajrang Prasad Yadav : बजरंग प्रसाद यादव यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. २०१४ मध्ये जेव्हा ते दहावीत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली.

वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
वडिलांच्या हत्येनंतरही मुलाने खचून न जाता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससी उत्तीर्ण करण्याचा मोठा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशच्या बजरंग प्रसाद यादव यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आयुष्यात अनेक संकटं, आव्हानं, बिकट परिस्थितीचा सामना करत त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल स्थान मिळवलं. बजरंग यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की, त्यांचा मुलगा अधिकारी व्हावा. आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी बजरंग यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याचा निर्णय घेतला.
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील रहिवासी बजरंग प्रसाद यादव यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. २०१४ मध्ये जेव्हा ते दहावीत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली. वडिलांच्या हत्येने ते पूर्णपणे हादरले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही खूप वाईट होती. दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती, पण बजरंग प्रसाद यांनी हार मानली नाही.
फी भरण्यासाठी विकलं धान्य
कठीण काळातही जिद्द सोडली नाही आणि आपला अभ्यास सुरू ठेवला. आर्थिक अडचणींमुळे, त्यांनी ट्यूशन फी भरण्यासाठी घरातील धान्यही विकलं. अनेक अडचणी असूनही, बजरंग यांनी कधीच आपलं शिक्षण सोडलं नाही. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये ते अपयशी ठरले, पण कठोर परिश्रम करत राहिले.
यूपीएससी परीक्षेत ४५४ वा रँक
सततच्या कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे फळ म्हणजे २०२२ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षेत ४५४ वा रँक मिळवला. हे यश त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. यासोबतच बजरंग प्रसाद यादव यांचं यश लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे जे जीवनातील कठीण परिस्थितींना तोंड देत आपलं ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करतात.