दुकानदाराने सामान घेण्यास दिला नकार; संतप्त १५ वर्षीय मुलीने ब्लेडने केला हल्ला, पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 18:31 IST2025-05-04T18:24:32+5:302025-05-04T18:31:48+5:30
उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलीने दुकानदारावर ब्लेडने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दुकानदाराने सामान घेण्यास दिला नकार; संतप्त १५ वर्षीय मुलीने ब्लेडने केला हल्ला, पोलिसांनी घेतले ताब्यात
UP Crime: उत्तर प्रदेशात दुकानदाराने सामान परत घेण्यास नकार दिल्याने संतप्त अल्पवयीन मुलीने ब्लेडने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार अल्पवयीन मुलगी सामान परत करण्यासाठी येत होती. मात्र यावेळी दुकानदाराने नकार दिल्यानंतर मुलीने वाद घालण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पैसे मिळाल्यानंतर अल्पवयीन मुलीने दुकानदारावर ब्लेडने हल्ला केला आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानातील इतरांनी तिला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या हल्ल्यात दुकानदाराच्या हाताला आणि पोटाला जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीने दुकानात वाद घालत दुकानदारावर ब्लेडने हल्ला केला. ज्यामुळे दुकानदार रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. मुलीचा काही वस्तू परत करण्यावरून दुकानदाराशी वाद झाला होता. सुरुवातीला दुकानदाराने सामान परत घेण्यास नकार दिला. मात्र थोड्यावेळाने दुकानदाराने मुलीला वस्तूचे पैसे परत केले. त्यानंतर जाता जाता मुलीने दुकानदारावर ब्लेडने वार केला. हा सगळा धक्कादायक प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दुकानदाराचा भाऊ देव सैनीने सांगितले की, "त्या मुलीने त्यांच्या दुकानात काही सामान आणले होते जे तिला परत करायचे होते. या मुलीने यापूर्वीही अनेक वेळा सामान परत केले होते. यावेळी आम्ही तिला आधीच सांगितले होते की यावेळी वस्तू परत घेणार नाही. जेव्हा भावाने मुलीला सांगितले की तो सामान परत घेणार नाही, तेव्हा ती संतापली आणि त्याला धमकावू लागली. त्यानंतर भावाने तिचे पैसे परत केले आणि तिला दुकानाबाहेर जाण्यास सांगितले. तितक्यात त्या मुलीने मागे वळून भावाच्या हातावर आणि पोटावर ब्लेडने हल्ला केला."
दरम्यान, दुकानदाराच्या कुटुंबाने घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डिंग पोलिसांना दिले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत तिची चौकशी सुरु केली आहे. मुलगी अल्पवयीन आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि हे प्रकरण बाल न्यायालयात पाठवले जाईल. या प्रकरणात नियमांनुसार कारवाई केली जात असून या प्रकरणाची सुनावणी बाल न्यायालयात होईल, असे पोलिसांनी सांगितले.