धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:02 IST2025-11-28T18:55:06+5:302025-11-28T19:02:39+5:30
UP News : मासेमारी करणाऱ्या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून चालकाचा जीव वाचवला.

धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
UP News : उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये गुरुवारी सकाळी मोठा अनर्थ टळला. अनियंत्रित झालेली कार थेट तलावात कोसळली आणि त्यात अडकलेला तरुण बेशुद्ध पडला. मात्र तलावात मासेमारी करणारा नाविक आणि रस्त्याने जाणाऱ्या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारत त्या तरुणाचा जीव वाचवला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात कार पाण्यात बुडत असल्याचे स्पष्टपणे दिसते.
घटना कशी घडली?
गुरुवार सकाळी सुमारे 10.40 वाजता शहरातील शिवम नावाचा युवक आपल्या कारने काशीराम बारातघर परिसरातून टनकपूर रोडकडे जात होता. अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार सरळ गौहनिया तलावात कोसळली. तलावातील खोल पाण्यामुळे शिवम कारमध्येच अडकला. काही मिनिटांच्या धडपडीनंतर तो बेशुद्ध पडला आणि परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
नाविकाचे शौर्य
तलावात मासेमारी करत असलेल्या नाविकाने कार पाण्यात बुडताना पाहताच तत्काळ कारकडे धाव घेतली. कारजवळ जाताना त्याची नाव उलटली, तरीही त्याने धैर्य सोडले नाही. प्रचंड प्रयत्नांनंतर त्याने शिवमला कारच्या आतून बाहेर काढले.
#पीलीभीत
— Raj Verma (@Raj_vermapbt) November 27, 2025
अनियंत्रित होकर गौहनिया तालाब में जा गिरी अर्टिगा कार।जान पर खेलकर कार में सवार व्यक्ति को बाहर निकल गया जिसे उपचार के लिए जिला अस्पताल भेजा गया है।पहले भी इस तालाब में वहुत सी घटनाएं घट चुकी हैं।मौके पर पहुंची कोतवाली पुलिस #pilibhitpic.twitter.com/9huOZOpWb7
यावेळी न्यूरिया येथील दिनेश नावाच्या तरुणाने मदतीसाठी तलावात उडी मारली. दोघांनी मिळून शिवमला सुरक्षित किनाऱ्यावर आणले. नंतर स्थानिक लोकही घटनास्थळी धावून आले व त्यांनी शिवमला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पीडित युवकाचा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
स्थानिक रहिवाशांचे आरोप
गौहनिया तलाव 1.538 हेक्टर परिसरात पसरलेला आहे. सौंदर्यीकरणाबाबत अनेक वर्षांपासून चर्चा आणि आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तलावाभोवती कुठलीही मजबूत बॅरिकेडिंग नाही. सकाळ-संध्याकाळ कमी दृश्यतेमुळे अपघाताची शक्यता वाढते. गेल्या काही वर्षांत येथे अनेक छोटी-मोठी दुर्घटना झाल्या आहेत. त्यामुळे आता रहिवाशांनी पुन्हा एकदा तलावाभोवती तातडीने बॅरिकेडिंग, प्रकाशव्यवस्था आणि इतर सुरक्षा उपायांची उभारण्याची मागणी केली आहे.