उत्तर प्रदेशात 24 तासांत 10 चकमकी; 8 शहरांमध्ये कारवाई, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:21 IST2025-05-28T14:21:14+5:302025-05-28T14:21:50+5:30
UP Crime: यूपी पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांविरोधात 'ऑपरेशन लंगडा' सुरू केले आहे.

उत्तर प्रदेशात 24 तासांत 10 चकमकी; 8 शहरांमध्ये कारवाई, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण...
UP Crime:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील पोलिसांना गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी फ्री हँड दिलेला आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यातील गुन्हेगारी बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. विशेष म्हणजे, योगी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कुख्यात गुन्हेगारांविरोधात एनकाउंटरच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 24 तासांत पोलिसांनी 10 एन्काउंटर केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशात गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचे ऑपरेशन एन्काउंटर सुरू आहे. यूपी पोलिस राज्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसीवर काम करत आहेत. त्यामुळेच पोलिस एकामागोमाग एक एन्काउंटर करत आहेत. यूपी पोलिसांनी 24 तासांत राज्यातील 10 शहरांमध्ये एन्काउंटर केले. या एन्काउंटरमध्ये अनेक मोठे गुन्हेगार पकडले गेले.
लखनऊमध्ये झालेल्या एन्काउंटरनंतर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपीला अटक केली, तर एका कॉन्स्टेबलच्या हत्येच्या आरोपीला गाझियाबादमध्ये अटक करण्यात आली. याशिवाय 25 हजारांचे बक्षीस असलेला गुन्हेगार शामलीमध्ये पकडण्यात आला, तर झाशी, बुलंदशहर, बागपत, आग्रा, जालौन, बलिया आणि उन्नाव येथे झालेल्या चकमकींनंतर पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे.
लखनौ: बलात्काराच्या आरोपींचा एन्काऊंटर
गाझियाबाद: खूनातील आरोपीच्या पायाला गोळी
शामली: गाय तस्कराशी चकमक
झांसी: वॉन्टेड गुन्हेगाराला गोळी लागली
बुलंदशहर: बलात्काराच्या आरोपीचा एन्काऊंटर
बागपत: दरोड्यातील आरोपीला पोलिसांनी पकडले
बलिया: फरार गुन्हेगाराला गोळी
आग्रा: चोरीच्या आरोपीचा एन्काऊंटर
जालौन: दरोड्यातील आरोपीचा एन्काऊंटर
उन्नाव: कुख्यात गुन्हेगाराशी चकमक
काय आहे ऑपरेशन लंगडा ?
ऑपरेशन लंगडा ही उत्तर प्रदेश पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध चालवली जाणारी मोहीम आहे, ज्यामध्ये पोलिस गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी चकमकींदरम्यान गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान, जर गुन्हेगाराने पळून जाण्याचा किंवा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस त्याच्या पायात गोळ्या घालतात आणि त्यांना लंगडा बनवतात, जेणेकरून तो भविष्यात गुन्हे करू शकणार नाहीत. या रणनीतीला अनौपचारिकरित्या "ऑपरेशन लंगडा" असे म्हणतात. याचा उद्देश गुन्हेगारांना शारीरिकदृष्ट्या अक्षम करणे आहे जेणेकरून ते पोलिसांपासून घाबरतील.