धावत्या डबल डेकर बसचे टायर फुटल्याने भीषण आग; 130 प्रवासी थोडक्यात वाचले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:27 IST2025-12-31T13:25:30+5:302025-12-31T13:27:01+5:30
UP Accident : गेल्या काही दिवसांपासून खासगी बस अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत.

धावत्या डबल डेकर बसचे टायर फुटल्याने भीषण आग; 130 प्रवासी थोडक्यात वाचले...
UP Accident : उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. लखनऊ-आग्रा एक्सप्रेसवे वर पानिपतहून बिहारकडे जाणाऱ्या डबल डेकर बसचा टायर अचानक फुटल्याने बसला आग लागली. घटनेवेळी बसमध्ये सुमारे 130 प्रवासी होते; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आले आणि मोठी जीवितहानी टळली.
टायर फुटताच आग; बसमध्ये गोंधळ
ही घटना तिर्वा कोतवाली हद्दीतील फगुआ गावाजवळ रात्री सुमारे 11 ते 11.30 दरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार, टायर फुटल्यानंतर झालेल्या तीव्र घर्षणामुळे बसने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी घाबरून बाहेर पडू लागले; मात्र त्याआधीच चालक-सहकाऱ्याने सर्वांना सुरक्षितरीत्या खाली उतरवले होते.
क्षणात बस आगीच्या विळख्यात
प्रवासी खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. एफएसएसओ संदीप तनवार आणि सीएफओ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.
सर्व प्रवासी सुरक्षित; प्रशासन तत्काळ सक्रिय
घटनेची माहिती मिळताच कन्नौजचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून आवश्यक मदतीचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिस प्रशासनाने सर्व प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थळी रवाना केले. आगीत बसचे मोठे नुकसान झाले असले तरी एकही प्रवासी जखमी झाला नसल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
वाहतूक काही काळ विस्कळीत
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, प्राथमिक तपासात टायर फुटल्यानंतर झालेल्या घर्षणामुळे आग लागल्याचे संकेत मिळत आहेत. या घटनेनंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती; मात्र नंतर परिस्थिती सामान्य करण्यात आली.
बस अपघातांची मालिका
गेल्या काही दिवसांपासून देशभरात बस अपघातांची मालिका सुरू झाली आहे. विविध राज्यांमध्ये खासगी बसेसचा अपघात आणि आग लागल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यापैकी काही घटनांमध्ये प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकजण सुदैवने वाचले आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे प्रवासी चिंतेत आहेत. प्रशासनाने अशा घटनांकडे तातडीने लक्ष घालण्याची आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.